ट्रकखाली येऊनही तरूण-तरूणी बचावले
By Admin | Updated: February 16, 2017 00:04 IST2017-02-16T00:04:22+5:302017-02-16T00:04:22+5:30
ट्रकने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील युवक-युवती ट्रकखाली आलेत.

ट्रकखाली येऊनही तरूण-तरूणी बचावले
काळ आला होता पण ... : मागून धडक दिल्याने अपघात
अमरावती : ट्रकने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील युवक-युवती ट्रकखाली आलेत. मात्र, 'देव तारी त्यांना कोण मारी,' या म्हणीनुसार या भीषण अपघातातून दोघेही सुखरुप बचावले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता बडनेरा रोडवरील समर्थ हायस्कूल चौकात घडली.
ऋषी भारत चक्रे (२३,रा. लोणी पोलीस क्वार्टर) व त्याची मैत्रीण कृष्णा चाटे (२०,रा.पार्वतीनगर) हे दोघेही शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकतात. बुधवारी दोघेही कृष्णा चाटे हिच्या मोपेड वाहन क्रमांक एम.एच. २७-बी.टी.-९९५७ ने नवाथेकडून राजापेठकडे येत होते. दरम्यान समर्थ हायस्कूल चौकातील गतिरोधकाजवळ बडनेराकडून राजापेठकडे येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक एम.एच. १४-व्ही-८९० ने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिली. अपघातात दुचाकी ट्रकखाली चिरडली गेली दोघेही ट्रकखाली आले.
दोघांनाही गंभीर दुखापत
अमरावती : त्यांच्या वाचण्याची शक्यता कमी होती. हे दृश्य पाहून प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर अक्षरश: शहारे आलेत. मात्र, ट्रक थांबताच नागरिकांनी तत्काळ दोघांनाही ट्रकखालून सुखरूप बाहेर काढले. मात्र, या भीषण अपघातात तरुणीच्या कंबरेला तर ऋषी चक्रेच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी दोघांनाही तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. पोलिसांनी ट्रक व चालक मसद्दीन हुसेन (४५,रा. धरमकाटा) याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली होती.