The youth, along with three minors, stole nine lakhs of gold | तीन अल्पवयीनांसह तरुणाने चोरले होते नऊ लाखांचे सोने
तीन अल्पवयीनांसह तरुणाने चोरले होते नऊ लाखांचे सोने

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : मुख्य आरोपीला अटक, अल्पवयीन ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सिटी कोतवाली हद्दीतील व्यापारी प्रतिष्ठान फोडून ३० तोळे सोने चोरणाऱ्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख शकील शेख मजिद (२२, रा. सुफियाननगर) याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ लाखांचे सोने व १० हजारांची रोकड असा एकूण ९ लाख १० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलीस सूत्रानुसार, भावेश राजेश कामदार (२३, रा. देशनानगर) यांनी ५ जून रोजी सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्यामध्ये त्यांच्या खत्री मार्केट येथील व्यापारी प्रतिष्ठानातून चोरांनी तीन लाखांची रोकड व १७ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाखांचा ऐवज चोरून नेल्याचे नमूद केले होते. या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सूक्ष्म निरीक्षण करून गुन्ह्याच्या पद्धतीचा अभ्यास केला. या गुन्ह्यात पोलिसांना रेकॉर्डवरील तीन अल्पवयीन निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांची चौकशी करून मुख्य आरोपी शेख शकीलला अटक केली. त्याच्याजवळून चोरीतील ९ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. फिर्यादीने १७ तोळे सोने चोरी गेल्याचे आधी तक्रारीत दिले होते. मात्र, त्यांच्या दुकानातून ३० तोळे सोने चोरीचे निदर्शनास आले.
यांनी लावला गुन्ह्याचा छडा
गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राम गीते, पोलीस हवालदार विकास रायबोले, अजय मिश्रा, जावेद अहमद, दिनेश नांदे, सुलतान शेख, निवृत्ती काकड व चालक अमोल बहादरपुरे यांनी गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळविले.
मौजमस्तीसाठी चोरी
तीन अल्पवयीनांनी मुख्य सूत्रधार आरोपीच्या मार्गदर्शनात व्यापारी प्रतिष्ठानात चोरी केली. चोरीतील पैशांतून मौजमस्ती करण्याचा त्यांचा उद्देश होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी आरोपींना गाठले.


Web Title: The youth, along with three minors, stole nine lakhs of gold
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.