युवा स्वाभिमानी, शिवसेनेत राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:01:12+5:30
दरवर्षी कोंडेश्वर मार्गावरील मधुबन वृद्धाश्रमात बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा व दिनेश बूब यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त फराळ, मिठाई, फळे आणि कपडे वाटपाचा कार्यक्रम घेतला जातो. यंदा दोघांनीही वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते.

युवा स्वाभिमानी, शिवसेनेत राडा
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : कोंडेश्वर मार्गातील मधुबन वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमातच शाब्दिक चकमकीनंतर आ. रवि राणा व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बूब यांच्यात धक्काबुक्की झाली. यानंतर युवा स्वाभिमान व शिवसेनेचे कार्यकर्ते वृद्धाश्रमात मोठ्या संख्येने दाखल झाले. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
दरवर्षी कोंडेश्वर मार्गावरील मधुबन वृद्धाश्रमात बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा व दिनेश बूब यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त फराळ, मिठाई, फळे आणि कपडे वाटपाचा कार्यक्रम घेतला जातो. यंदा दोघांनीही वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते. रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास दिनेश बूब यांचा कार्यक्रम सुरू असतानाच आमदार रवि राणा कार्यकर्त्यांसह वृद्धाश्रमात दाखल झाले. त्यावेळी दोघांमध्ये राजकीय वादातून शाब्दिक चकमक उडाली. त्याचे रूपांतर धक्काबुक्कीसह हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांचा मोठा ताफा वृद्धाश्रमात दाखल झाला. या घटनेच्या माहितीवरून पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्यासह बडनेराचे ठाणेदार शरद कुळकर्णी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. वृद्धाश्रमात यावेळी मावळते कृषिमंत्री अनिल बोंडे, विलास इंगोले, सोमेश्वर पुसदकर, संजय तिरथकर, विश्वस्तासह शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, चर्चेला उधाण आले आहे. बडनेरात विविध ठिकाणी दोन्ही पक्षांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी निदर्शनास आली. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक भयभीत
दिवाळीनिमित्त वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना फराळ, फळे व कपडे वाटपाचा कार्यक्रम सुरू असतानाच हा वाद उफाळून आल्याने जेष्ठ नागरिकांची तारांबळ उडाली. ते अवाक् होऊन हा सर्व प्रकार पाहत होते. त्यातच या कार्यक्रमात सहभागी लहान मुले व महिला वर्गही हा गोंधळ पाहून भयभीत झाले होते.
ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी गेलो असता, तेथे उपस्थित दिनेश बूब यांनी मला शिवीगाळ केली. त्यांनी निवडणुकीत महिला खासदाराविषयी अपप्रचार करून अपमानित केले होते. अंबानगरीच्या संस्कृतीला न शोभणारे हे कृत्य त्यांनी केले आहे.
- रवि राणा, आमदार
बडनेरा मतदारसंघ
वृद्ध बांधवासोबत दिवाळी साजरी करीत होतो. त्याच वेळी काही कारण नसताना आ. राणा अंगावर चालून आले. प्रत्युत्तरादाखल मला हाणामारी करावी लागली. मी शेकडो महिलांना न्याय दिला आहे. महिलांचा अपमान केल्याचा कांगावा आ. राणांकडून केला जात आहे, तो चुकीचा आहे.
- दिनेश बूब
शिवसेना जिल्हाप्रमुख