‘त्या’ विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी तरुणाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST2021-09-08T04:18:28+5:302021-09-08T04:18:28+5:30
अमरावती : अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावासाची (जन्मठेप) शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश ...

‘त्या’ विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी तरुणाला जन्मठेप
अमरावती : अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावासाची (जन्मठेप) शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश क्रमांक ४ एस.ए. सिन्हा यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. अंबादेवी ते राजापेठ मार्गावर ९ जुलै २०१९ रोजी ही थरारक घटना घडली होती. तुषार मस्करे (२४, रा. मलकापूर, जि. अमरावती) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
विधी सूत्रांनुसार, ९ जुलै रोजी दुपारी २.३० ते ३ च्या सुमारास अल्पवयीन मुलगी व तिची अल्पवयीन मैत्रिण या अंबादेवी ते राजापेठ या रस्त्याने क्लासेसला जात असताना, आरोपीने मागून येऊन दोनपैकी एका मुलीवर चाकूने सपासप वार केले. सोबतच्या मुलीने अडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिच्यावरदेखील वार केला. मुलीला जिवे मारल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जात असताना लोकांनी त्याला पकडले. त्याला शस्त्रासह घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले होते.
तक्रारीनुसार, मृतक व आरोपीमध्ये पूर्वी प्रेमसंबंध होते. मृताने प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिला होता. घटनेच्या एक महिन्यापूर्वी आरोपीकडून त्रास असल्याने पीडिताने बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. घटनेच्या दिवशी आरोपीने गोल टोपी घालून मुलीचा पाठलाग केला होता. या प्रकरणात १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच साक्षीदार आदींचा साक्ष महत्त्वाची ठरली. घटनास्थळालगतच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजदेखील जप्त करण्यात आले. पुरावा म्हणून ते न्यायालयासमक्ष सादर करण्यात आले. या प्रकरणी सरकारपक्षातर्फे जिल्हा शासकीय अभियोक्ता परीक्षित गणोरकर यांनी युक्तिवाद केला.
न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी तुषार मस्करे याला खूनप्रकरणी दोषी ठरवून त्यास आजन्म कारावास व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम मृताच्या परिजनास देण्याबाबत आदेश दिला आहे. विनयभंगप्रकरणी दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. न्यायालयाने दिलेल्या सर्व शिक्षा आरोपीस एकत्रित भोगावयाच्या आहेत. पैरवी अधिकारी म्हणून एएसआय गणेश निशाणराव व नायक पोलस कॉन्स्टेबल अरुण हटवार यांनी काम पाहिले.