शेंदूरजनाघाट येथील युवकाची दगडाने ठेचून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 22:25 IST2018-05-22T22:25:05+5:302018-05-22T22:25:20+5:30
स्थानिक पिंपळपुरा परिसरातील २७ वर्षीय युवकाचा मृतदेह मंगळवारी सकाळी वाई शिवारातील एका शेतात आढळून आला. रिसेप्शनला जात असल्याचे सांगून तो सोमवारी सायंकाळी दुचाकीने घराबाहेर पडला होता. शेंदूरजनाघाट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.

शेंदूरजनाघाट येथील युवकाची दगडाने ठेचून हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंदूरजनाघाट : स्थानिक पिंपळपुरा परिसरातील २७ वर्षीय युवकाचा मृतदेह मंगळवारी सकाळी वाई शिवारातील एका शेतात आढळून आला. रिसेप्शनला जात असल्याचे सांगून तो सोमवारी सायंकाळी दुचाकीने घराबाहेर पडला होता. शेंदूरजनाघाट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.
नीलेश वामन ठाकरे असे मृताचे नाव आहे. तो २१ मे रोजी सायंकाळच्या सुमारास रिसेप्शनला जात असल्याचे सांगून एम.एच. २७ वाय ३४५७ क्रमांकाच्या दुचाकीने घरून निघाला. रात्री उशिरा घरी न परतल्याने त्याचा शोध घेतला असता, मंगळवारी सकाळी वाई शिवारातील वरूडकर यांच्या शेतात मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती शेंदूरजनाघाट पोलिसांना मिळाल्यावरून ठाणेदार शेषराव नितनवरे, उपनिरीक्षक कनाटे, जमादार लक्ष्मण साने, कॉन्स्टेबल पंकज गावंडे, अतुल मस्के, प्रशांत गिरडकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. चेहरा दगडाने ठेचून आणि कमरेच्या बेल्टने गळा आवळून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय वरूड येथे पाठविण्यात आला.
मृतासोबत दुचाकीवर कोण होते, याबाबत शेंदूरजनाघाट पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी यांनी घटनास्थळाला भेट दिली.