अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:03+5:302021-06-17T04:10:03+5:30

अमरावती : राज्य शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’ अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन ...

You will get a new home connection as soon as you apply | अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीजोडणी

अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीजोडणी

अमरावती : राज्य शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’ अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी अर्जदारांकडून योग्य कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त होताच महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकाराने व महावितरणचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात १४ एप्रिलपासून ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थी अर्जदारांना वीजजोडणीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सोय आहे. लाभार्थ्यांना या योजनेमधून घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणकडे एकूण ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कमदेखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

महावितरणकडून वीज जोडणीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांमध्ये वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येईल. तसेच ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे, अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपाययोजना सहित) किंवा कृषी आकस्मिकता निधी व इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीतून प्राधान्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येईल व संबंधित लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येईल.

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी नवीन वीजजोडणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, वीजजोडणीच्या विहित नमून्यातील अर्जासोबत आधार कार्ड, रहिवासी कार्ड जोडावे. वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी वीजबिलाची पूर्वीची थकबाकी नसावी. तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीजसंच मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.या योजनेविषयीची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: You will get a new home connection as soon as you apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.