मन:शांतीसाठी योगाला पर्याय नाही
By Admin | Updated: June 23, 2015 00:44 IST2015-06-23T00:44:31+5:302015-06-23T00:44:31+5:30
जगातील सर्व धनापेक्षा सर्वश्रेष्ठ धन म्हणजे आरोग्य धन आणि संतोषधन.

मन:शांतीसाठी योगाला पर्याय नाही
नवनीत राणा : ‘लोकमत’ सखी मंच, फुले महाविद्यालयाचा उपक्रम
वरूड : जगातील सर्व धनापेक्षा सर्वश्रेष्ठ धन म्हणजे आरोग्य धन आणि संतोषधन. यातनायुक्त शरीराने मनुष्य जगातील कोणत्याही सुखाचा उपभोग घेऊ शकणार नाही. स्वत:चे आरोग्य जपायचे असेल तर योगा करणे काळाची गरज आहे. ते दुसऱ्यासाठी नाही तर स्वत:साठी तरी करावे. उद्याची वाट न पाहता आजपासूनच योगा करण्याची तयारी केली पाहिजे, असे प्रतिपादन नवनीत राणा यांनी स्थानिक महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित योग शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महात्मा फुले महाविद्यालयाचे प्रांगणात लोकमत सखी मंच, योग असोसिएशन, महात्मा फुले महाविद्यालय, डहाणे वेट लॉस क्लिनिक, विश्वकृपा आयुर्वेदालय आर्ट आॅफ लिव्हींग, जायन्टस ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क २० दिवसीय योग शिबिर घेण्यात आले.
सर्वांगीण व्यायामाचे उगमस्थान मुळी योगा आहे. पतंजली मुनीने योगाची आठ अंगे सांगितली आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. ही सर्व अंगे मनुष्याला नैतिक, शारीरिीक, मानसिक व आध्यात्मिक शिस्त लावते. या वरील अष्टांगाचा योग्यप्रकारे अभ्यास केला असता. शरीरातील सर्व भागांचा व्यायाम होतो. एवढेच नव्हे तर बुद्धी प्रखर होऊन आत्मा प्रकाशित करते, असेही राणा यांनी यावेळी सांगितले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्यर् देवानंद अतकरे, विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री नवनीत राणा, प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून हनुमान व्यायाम शाळेचे योगतज्ज्ञ अरुण खोडस्कर, जायन्ट्सचे अध्यक्ष मनोहर आंडे, हेमंत सोनारे, डहाणे वेट लॉस क्लिनिक संचालिका वर्षा डहाणे, आशिष डहाणे, चरण सोनारे, संजय खासबागे, योगतज्ज्ञ अल्का कुथे, गायधने, अशोक नानोटकर, प्रशिक्षक स्वाती गडेकरसह आदी मान्यवर उपस्थित होते. योग शिबरानिमित्ताने तीन गटात योग स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. योग प्रशिक्षकांचासुध्दा हृदयसत्कार करण्यात आला. यामध्ये किरण अतकरे, स्वाती गडेकर आणि अशोक नानोटकर यांचा समावेश आहे. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण अतकरे यांनी करुन योगाबद्दल आणि शिबिराबाबत माहिती दिली. संचालन सपना देशमुख यांनी, आभार रचना सोनारे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता महात्मा फुले महाविद्यालय, लोकमत सखीमंचच्या रचना सोनारे, सपना देशमुख, संयोगीता खासबागे, प्रेमा राऊत, मीना बंदे, सोनाली आंडे, जायन्टस ग्रुप, वरुड तालुका योग असोसिएशन, आर्ट आॅफ लिव्हींगच्यावतीने महात्मा फुले महाविद्यालयाचे पदाधिकारी, लोकमत सखीमंच सदस्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)