सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकचा ‘अटॅक’
By Admin | Updated: September 29, 2014 00:32 IST2014-09-29T00:32:05+5:302014-09-29T00:32:05+5:30
जिल्ह्यात खरिपाचे सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या सोयाबीन पिकावर अपुरा पाऊस, निकृष्ट बियाणे यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला असून ‘पिवळ्या मोझॅक’ रोगाने आक्रमण केले आहे.

सोयाबीनवर पिवळ्या मोझॅकचा ‘अटॅक’
शेतकरी संकटात : पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव
अमरावती : जिल्ह्यात खरिपाचे सर्वाधिक क्षेत्र असणाऱ्या सोयाबीन पिकावर अपुरा पाऊस, निकृष्ट बियाणे यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला असून ‘पिवळ्या मोझॅक’ रोगाने आक्रमण केले आहे.
यामुळे सोयाबीनची रोपे पिवळी पडत असून सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे. तसेच हे रोगट बियाणे चांगल्या बियाण्यांमध्ये मिसळल्यास पुढच्या हंगामात पुन्हा रोगांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंदा तब्बल दीड महिना उशिरा आलेला पाऊस व नंतरही पावसात पडलेला खंड यामुळे आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत सोयाबीनची पेरणी झाली. जिल्ह्यात ३ लाख २० हजार हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे. यापैकी काही क्षेत्रात कृषी विभागाने शिफारस न केलेल्या बियाण्यांची पेरणी करण्यात आली आहे. अप्रमाणित व निकृष्ट बियाण्यांचा वापर केल्याने रोपांची पुरशी वाढ झाली नाही. त्यावर आता पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव झाला आहे. रोपाच्या शेंड्यावर पिवळ्या व आकाराने लहान पाने दिसून येत आहे.