यशोदानगर परिसरात पुन्हा बंदचा प्रयत्न

By Admin | Updated: November 6, 2014 22:47 IST2014-11-06T22:47:41+5:302014-11-06T22:47:41+5:30

सोशल मीडियावर महामानवांचे आक्षपार्ह छायाचित्रे आणि मजकूर अपलोड प्रकरणी यशोदानगर ते दस्तूरनगर भागात बुधवारी बाजारपेठ बंद करुन प्रचंड तोडफोड, दगडफेक, नासधुस व मारहाणीची घटना घडली.

Yehoshodnagar area closed again | यशोदानगर परिसरात पुन्हा बंदचा प्रयत्न

यशोदानगर परिसरात पुन्हा बंदचा प्रयत्न

पोलीस बंदोबस्तात बाजारपेठ सुरु
अमरावती : सोशल मीडियावर महामानवांचे आक्षपार्ह छायाचित्रे आणि मजकूर अपलोड प्रकरणी यशोदानगर ते दस्तूरनगर भागात बुधवारी बाजारपेठ बंद करुन प्रचंड तोडफोड, दगडफेक, नासधुस व मारहाणीची घटना घडली. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा याच परिसरात व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला. याप्रकरणी नगरसेवकासह दहा जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारच्या घटनेत तिघांना अटक करण्यात आली असून ३० ते ४० जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दस्तुरनगर ते यशोदानगर मार्गावर बुधवारी सायंकाळी अचानक दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.
तोडफोड प्रकरणी तिघांना अटक
दुचाकीवर आलेल्या एका टोळक्याने या मार्गावरील बाजारपेठ जबरीने बंद करताना दुकानांची प्रचंड नासधूस केली होती. दस्तुरनगर चौकात मारहाणीचीही घटना घडली. परंतु पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. अतिरिक्त पोलीस बंदोबस्तसुद्धा तैनात करण्यात आला.
दरम्यान गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नगरसेवक अजय गोंडाणे यांच्या नेतृत्वात यशोदानगर, दस्तुरनगर, मोतीनगर भागात बाजारपेठ बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आली. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन नगरसेवक अजय गोंडाणेसह राजेश बागडे, अमोल चिंचखेडे, उत्तमराव धंदर, जितू कंठाळे, विष्णू मेश्राम, सुबोध मेश्राम, रमेश मेश्राम, नरेंद्र बोरकर, वीरेंद्र गजभिये व मनोज भाले या दहा जणांना ताब्यात घेतले.
दुसरीकडे बुधवारी यशोदानगर परिसरात धुमाकुळ घालणाऱ्या या टोळक्यांचा शोध सुरु करुन संजय गांधीनगर नं. २ येथील रहिवासी सुरेश तायडे याला अटक केली.
तसेच अटकेत अन्य दोघांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच दुकानाची तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी येथील कंवरनगर परिसरातील एसएसडी विहार येथील रहिवासी सुनीलकुमार ताराचंद दारा यांच्या तक्रारीनुसार वाहन क्रमांक एमएच २७ बीडी ३२०७ चा चालक व अज्ञात ३० ते ४० जणांविरूद्ध भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ४२७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रियाजोद्दीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सतीश इंगळे करीत आहे. बुधवारी झालेल्या घटनेनंतर पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी शांतता समितीची बैठक बोलाविली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Yehoshodnagar area closed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.