यंदा व्यक्ती, जाती-केंद्रित निवडणूक
By Admin | Updated: September 29, 2014 22:53 IST2014-09-29T22:53:40+5:302014-09-29T22:53:40+5:30
आघाडी, युतीत ताटातूट झाल्यानंतर जिल्ह्यातील मतदारसंघांत सर्वच राजकीय पक्षांना उमेदवार निश्चित करताना घाम फुटला. राजकीय पक्षांना अन्य पक्षातील उमेदवार आयात करुन त्यांना ‘बी फॉर्म’ द्यावे लागले.

यंदा व्यक्ती, जाती-केंद्रित निवडणूक
गणेश वासनिक - अमरावती
आघाडी, युतीत ताटातूट झाल्यानंतर जिल्ह्यातील मतदारसंघांत सर्वच राजकीय पक्षांना उमेदवार निश्चित करताना घाम फुटला. राजकीय पक्षांना अन्य पक्षातील उमेदवार आयात करुन त्यांना ‘बी फॉर्म’ द्यावे लागले. त्यामुळे यापूर्वी कोण कोणत्या पक्षात होता, आता त्याने कोण्या पक्षाची उमेदवारी घेतली, हे मतदारांना कळेनासे झाले आहे. एकूणच ही निवडणूक व्यक्ती आणि जातीकेंद्रित झाल्याचे चित्र आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, बसपा या प्रमुख पक्षांसह सामजिक संघटना, अपक्ष उमेदवारांची विधानसभा निवडणुकीत भाऊगर्दी झाली आहे. मतदारसंघात प्रभाव पाडणारे नेतृत्व विधानसभा निवडणूक लढवीत असल्याने मतदारही संभ्रमात आहेत. सरस उमेदवारांची मैदानात गर्दी होणार असल्याने मतदारांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, ही निवडणूक सरतेशेवटी उमेदवारांचे व्यक्तीवलय आणि समाजाभोवती फिरणार असल्याचे संकेत आहे. इतर राज्यांत पार पडलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला फारसे यश आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारसंघांत उमेदवारांचे व्यक्तिगत हितसंबंध व समाजाचे प्राबल्य यावर बरेच काही अवलंबून राहील. प्रत्येक मतदारसंघात विशिष्ट समाजाचे प्राबल्य असल्याने तो समाज ज्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहील, त्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातो. यात पक्षाचेही मतदान महत्त्वपूर्ण ठरते. अमरावती, बडनेरा मतदारसंघात मुस्लिम, दलितांची मते निर्णायक राहतील. अमरावतीत परंपरागत देशमुख, पाटील व हिंदी भाषिकांचे वर्चस्व राहिले आहे. अचलपुरात माळी, दर्यापूर येथे पाटील, कोळी, बारी मेळघाटात पाटील, व्यापारी तर तिवस्यात धनगर, कोळी समाजाची मते निर्णायक मानली जाते. मोर्शीत माळी, आदिवासी तर धामणगावात पाटील, तेली व दलित मतांवर उमेदवारांची भिस्त आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना धक्का देण्यासाठी बसपाने अमरावती, अचलपूर, तिवसा येथून उमेदवार उभे केले आहेत. मात्र, बसपाचे उमेदवार फार प्रभाव पाडतील, असे तुर्तास तरी चित्र नाही. एक आॅक्टोबरपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. प्रत्येक उमेदवार विशिष्ट समाजाची मते त्यांच्या बाजूने वळविण्यासाठी जातीय समीकरणे मांडणाच्या तयारीत आहेत. मैदानात उमेदवारांची भाऊगर्दी असली तरी त्या उमेदवारांच्या चारित्र्यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. उमेदवारांनी नाती-गोती, समाजाचे प्राबल्य कसे उपयोगी पडेल, याची जोरदार तयारी चालविली आहे.