यंदा आयकर, विक्रीकरचा ‘वॉच’

By Admin | Updated: January 11, 2017 00:12 IST2017-01-11T00:12:48+5:302017-01-11T00:12:48+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता कुठल्याहीक्षणी जाहीर होऊ शकते. यासाठी जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू आहे.

This year, income tax, sales tax 'watch' | यंदा आयकर, विक्रीकरचा ‘वॉच’

यंदा आयकर, विक्रीकरचा ‘वॉच’

निवडणूक : आचार संहितेसाठी समितीचे होणार गठन
अमरावती : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता कुठल्याहीक्षणी जाहीर होऊ शकते. यासाठी जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी एक निवडणूक संनियंत्रण समिती गठित करण्यात येणार आहे. यामध्ये यावेळी प्रथमच आयकर, विक्रीकर व बँकांचे अधिकारी या समितीमध्ये राहणार आहेत.
यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, अबकारी विभागाचे अधिकारी अनिवार्य सदस्य आहेत, तर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, राज्य प्रादेशिक परिवहन कार्यालय, विद्यापीठ आदी आवश्यकतेप्रमाणे सदस्य राहणार आहेत. समितीच्या योग्य त्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी सचिव म्हणून नियुक्ती करणार आहेत.
जिल्ह्यात महापालिकेचीही निवडणूक राहणार असल्याने महापालिकेचे आयुक्तही समितीशी समन्वय ठेवणार आहेत. समितीला सर्व विषयावर शास्त्रोक्त आराखडा तयार करावयाचा आहे व त्या अन्वये कारवाई करणे अपेक्षित आहे. यामध्ये निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या पैसा व मद्य आदींच्या वाटपावर अंकुश लावणे, उमेदवारांचा दैनंदिन खर्च व राजकीय पक्षांचा खर्चाविषयीची माहिती प्रशासनास सादर करणे, रोख रकमांच्या ने-आण करण्यासंदर्भात लक्ष ठेवणे व यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष ठेवणे, वित्तीय हवाला दलाल, तारण आदी ठिकाणचे व्यवहार व हालचालीवर लक्ष ठेवणे, बँकांमार्फ होणाऱ्या मोठ्या व संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवणे, तसेच पेडन्यूज, सोशल कमेंट, सोशल मीडिया व इंटरनेटवर लक्ष ठेवावे लागणार आहे.
आचारसंहिता कालावधीत निवडणुकीच्या क्षेत्राक घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना, मिरवणुका, प्रचारफेऱ्या, सभा अथवा आचारसंहितेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या घटनांचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. दरम्यानच्या कालावधीत व्हिडीओग्राफी सर्व्हेलियन प्रथम वेळेवर पोहचू न शकल्यास पथकाद्वारे मोबाईलवर चित्रिकरण करण्यात येणार आहे.

भरारी पथक
करणार तपासणी
पैशाची व मद्याची अवैध मार्गाने वाहतूक, मतदारांना प्रलोभने ठरतील, अशा व अन्य संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक तैनात करण्यात येणार आहे. पथकाद्वारा आवश्यक ती कारवाई करून त्या वस्तू जप्त करण्यात येणार आहे.

तक्रार निवारण कक्ष होणार स्थापन
आचारसंहिता भंगची तक्रार स्वीकारण्यासाठी व त्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी आवश्कतेप्रमाणे जिल्हास्तर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय कंट्रोल रुम किंवा कॉल सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे. या ठिकाणच्या दूरध्वनी व मोबाईल क्रमांकाला प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

चेकपोस्टवर
राहणार पथक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रातील महत्त्वाचे नाके आदी ठिकाणावरून मद्य व शस्त्रांची अवैध वाहतूक तसेच मतदारांना प्रलोभन ठरतील, अशा वस्तुंची व पैशांची वाहतूक होऊ शकते अशा ठिकाणी चेकपोस्ट तयार करुन पथक नेमण्यात येणार आहेत.

Web Title: This year, income tax, sales tax 'watch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.