यवतमाळ वळण मार्गाची निर्मिती होणार
By Admin | Updated: September 13, 2014 00:55 IST2014-09-13T00:55:45+5:302014-09-13T00:55:45+5:30
बेलोरा विमानतळाचे नुतनीकरण आणि विस्तारीकरणात आडकाठी ठरणारा बडनेरा ते यवतमाळ या राज्य मार्गाचे नव्याने वळण मार्ग निर्माण केला जाणार आहे.

यवतमाळ वळण मार्गाची निर्मिती होणार
अमरावती: बेलोरा विमानतळाचे नुतनीकरण आणि विस्तारीकरणात आडकाठी ठरणारा बडनेरा ते यवतमाळ या राज्य मार्गाचे नव्याने वळण मार्ग निर्माण केला जाणार आहे. अकोला महामार्गाहून ४ कि.मी. लांबीचा हा वळण मार्ग पुढे जळू या गावालगत काढला जाणार आहे. सुमारे १३.२८ कोटींचा खर्च अपेक्षित असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
अमरावतीच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण तांत्रिक अडचणीत सापडले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्या वळण मार्गाचे निर्मिती करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या मार्गाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या जमीनीचे हस्तातंरण करण्यात आले आहे. या वळण मार्गाच्या निर्मितीकरीता शासनाने मान्यता प्रदान करावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. शासनाने या वळण मार्गाच्या निर्मितीला मान्यता देताच हा मार्ग युद्धस्तरावर निर्माण केला जाईल, असे बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यानी सांगितले. बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण करताना ६०० मिटर लांबीचा जुना यवतमाळ मार्ग विमानतळाच्या सीमेत जाणार आहे. यापूर्वी शासनाने २००९ मध्ये या वळण मार्गाच्या निर्मितीकरीता मंजुरी दिली होती. मात्र, काही कारणांमुळे त्यावेळी हा यवतमाळ वळण मार्ग निर्माण होऊ शकला नाही. अखेर शासनाने नव्याने या वळण मार्गाचे सुधारीत दरपत्रक पाठविण्याचे कळविले. त्यानुसार ४ कि.मी. लांबीचा नवा वळण मार्ग निर्मितीच्या सुधारीत प्रस्तावात १३ कोटी २८ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला कळविले आहे. जुना यवतमाळ मार्ग बंद करीत असताना बेलोरा विमातळासमोरील मार्ग रहदारीस खुला राहिल, अशी माहिती आहे. नवा वळण मार्ग निर्मितीला प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा आहे. यवतमाळ मार्गावरील जळू या गावचे नव्या वळण मार्गामुळे काहीअंशी वैभव हरपण्याची भीती आहे. परंतु बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी ताब्यात घेण्यात आल्यात ते शेतकरी आजही विमानतळाच्या विस्तारीकरणाची आस लावून आहेत. शासनाची उदासीनता आणि निधीची वाणवा या दुहेरी कात्रीत बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, नुतनीकरण रखडल्याचे चित्र आहे. मात्र नव्याने राज्य शासनाने विमातळाचे विस्तारीकरणाचे धोरण हाती घेतल्याने बेलोरा विमानतळाचे आता विस्तारीकरण होणार असल्याचे संकेत आहेत. त्यानुसार पहिला टप्पा म्हणून यवतमाळ मार्गाचे वळण रस्ता निर्मितीचे कार्य हाती घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.