बडनेऱ्यात लसीकरणासाठी यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 05:00 IST2021-05-12T05:00:00+5:302021-05-12T05:00:54+5:30
महानगरपालिका हद्दीत केवळ बडनेरातील महापालिकेच्या हरिभाऊ वाठ दवाखान्यात मंगळवारी कोव्हॅक्सिनचा डोज दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. एकमेव केंद्र असल्याने लस टोचून घेण्यासाठी अमरावती, बडनेरा व लगतच्या खेड्यांतील नागरिकांनी येथे एकच गर्दी केली. पहाटे ४ पासून लोक रांगेत उभे होते. मात्र, सकाळचे दहा वाजले तरी टोकन मिळत नसल्याने गोंधळ सुरू झाला.

बडनेऱ्यात लसीकरणासाठी यात्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : तीन आठवड्यानंतर उपलब्ध झालेल्या कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोज घेण्यासाठी येथील हरिभाऊ वाठ दवाखान्यात मंगळवारी यात्रेसमान गर्दी लोटली. प्रचंड गोंधळानंतर फक्त १३० लोकांना लसीकरणाचे टोकण देण्यात आले. कोव्हॅक्सिनसाठी हे एकमेव केंद्र असल्यामुळे गर्दी झाली. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
महानगरपालिका हद्दीत केवळ बडनेरातील महापालिकेच्या हरिभाऊ वाठ दवाखान्यात मंगळवारी कोव्हॅक्सिनचा डोज दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. एकमेव केंद्र असल्याने लस टोचून घेण्यासाठी अमरावती, बडनेरा व लगतच्या खेड्यांतील नागरिकांनी येथे एकच गर्दी केली. पहाटे ४ पासून लोक रांगेत उभे होते. मात्र, सकाळचे दहा वाजले तरी टोकन मिळत नसल्याने गोंधळ सुरू झाला. केंद्रावरील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गर्दी आटोक्याबाहेर गेल्याने शेवटी पोलिसांचा ताफा येथे आला व त्यानंतर १३० लोकांना टोकन देण्यात आले. उर्वरित निराशेने परत गेले. केंद्राला महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनीदेखील भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
केंद्रावर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोज घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या प्रचंड गर्दीने लसीकरण मोहिमेतील ढिसाळपणा समोर आला. हे लसीकरण केंद्र की कोरोना हॉटस्पॉटचे ठिकाण, अशी शंका उपस्थित करण्यात आली. या केंद्रापासून थोड्या अंतरावरील तेलीपुरा येथे महापालिका शाळेची मोठी जागा आहे. सदर केंद्र येथे हलविल्यास सोयीचे ठरेल, असे नागरिकांनी सांगितले.
कोव्हॅक्सिनच्या एकमेव केंद्रामुळे झुंबड
बडनेरातील हरिभाऊ वाठ दवाखाना हे कोव्हॅक्सिनच्या लसीकरणासाठी महापालिका अंतर्गत एकमेव केंद्र आहे. अमरावती शहरातदेखील कोव्हॅक्सिनचे दुसरे केंद्र उपलब्ध असते, तर एवढी गर्दी झाली नसती. याचे योग्य ते नियोजन प्रशासनाने करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.