यशवंत पंचायतराज अभियानात अमरावती जि. प. विभागात अव्वल

By जितेंद्र दखने | Updated: April 2, 2025 20:55 IST2025-04-02T20:55:11+5:302025-04-02T20:55:26+5:30

निकाल घोषित : तिवसा,अंजनगाव सुर्जी पंचायत समितीची दमदार कामगिरी

Yashwant tops Amravati District in Panchayat Raj Campaign in West Division | यशवंत पंचायतराज अभियानात अमरावती जि. प. विभागात अव्वल

यशवंत पंचायतराज अभियानात अमरावती जि. प. विभागात अव्वल

- जितेंद्र दखने

अमरावती : प्रशासकीय व्यवस्थापन व विकासकार्यात उत्तम काम करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार योजनेंतर्गत २०२४-२५ चा विभागीय स्तरीय निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अमरावती जिल्हा परिषद विभागात प्रथम आली असून, याशिवाय जिल्ह्यातील तिवसा व अंजनगाव सुर्जी या दोन पंचायत समित्यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकाविला आहे, तर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पंचायत समिती विभागात तृतीय आली आहे.

विशेष म्हणजे सन २०२३-२४ मध्येही अमरावती जिल्हा परिषद विभागात प्रथम आलेली आहे. राज्यामधील विकासाच्या सर्व योजना पंचायतराज संस्थांमार्फत राबविल्या जातात. यासाठी राज्यात पंचायतराज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांसाठी विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान ही पुरस्कार योजना सुरू केली आहे. ग्रामीण विकास क्षेत्रात यशवंत पंचायतराज हा सर्वसमावेशक पुरस्कार असल्याने अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. शाश्वत विकास ध्येयांचे निकष व राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांतर्गत अमरावती जिल्हा परिषद व तिवसा, अंजनगाव सुर्जी पंचायत समित्यांनी केलेली प्रगती विचारात घेऊन यशवंत पंचायतराज अभियान सन २०२४-२५ (मूल्यमापन वर्ष २०२३-२४) राबविण्यात आले होते. यामध्ये जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समिती यांनी सहभाग घेतला होता. विभागातून प्रथम क्रमांकावर आल्यामुळे राज्यस्तरावरून होणाऱ्या मूल्यमापन स्पर्धेकरिता जिल्हा परिषद व तिवसा, अंजनगाव व शेगाव पंचायत समिती पात्र झाली.

सलग दुसऱ्यांदा बाजी 
या अभिनव उपक्रमामध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेने विविध विभागामार्फत वर्षभर राबविलेल्या शासनाच्या योजनांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले. विभागस्तरीय समितीने जिल्हा परिषदेला काही महिन्यांपूर्वीच भेट देऊन जिल्हा परिषदेने केलेल्या मूल्यमापन प्रतवारी अहवालाची तपासणी केली. विभागस्तरीय समितीने केलेल्या तपासणीमध्ये अमरावती जिल्हा परिषदेने सलग दुसऱ्यांदा विभागातून प्रथम क्रमांक  पटकाविल्याची माहिती सीईओ संजीता महापात्र यांनी दिली.
 

Web Title: Yashwant tops Amravati District in Panchayat Raj Campaign in West Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.