अमरावती - पोलीस शिपाई पदावर बुद्धिमान उमेदवारांची निवड करण्याच्या उद्देशाने आता प्रथम लेखी परीक्षा व त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी बोलावण्याचा निर्णय पोलीस विभागाने घेतला आहे. या निर्णयाचे तरुणांनी स्वागत केले असून, बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलीस दलातील कर्मचाºयांचे कामाचे स्वरूप बदलले असल्याने शक्तीसोबत समयसूचकता ठेवून तत्परतेने काम करणे आवश्यक झाले आहे. पोलीस शिपाई पदभरतीवेळी शारीरिक चाचणी आधी घेण्यात येत होती. या चाचणीदरम्यान काही दुर्घटनाही झाल्या आहेत.याशिवाय शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होणारे काही तरुण लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण होत असल्याचेही आढळून आले. त्यामुळे शारीरिक चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी परिश्रम घेणाºया उमेदवारांची निराशा होती होते. अशा सर्व बाबी विचारात घेऊन शासनाने पोलीस शिपाई पदभरतीत प्रथम लेखी परीक्षा व त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त झालेल्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविले जाणार आहे. त्यामुळे भरतिप्रक्रिया रेंगाळणार नाही तसेच परजिल्ह्यातील उमेदवारांनाही ताटकळत राहावे लागणार नाही. उमेदवारांना या बदलाचा फायदा होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
पोलीस भरतीत आधी लेखी परीक्षा, नंतर शारीरिक चाचणी; बेरोजगारांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 20:58 IST