श्रमिक पत्रकार भवनाचे लोकार्पण
By Admin | Updated: July 20, 2015 00:13 IST2015-07-20T00:13:57+5:302015-07-20T00:13:57+5:30
राजापेठ येथील महापालिका संकुलात श्रमिक पत्रकार संघटनेद्वारा नवनिर्मित पत्रकार भवनाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात पार पडले.

श्रमिक पत्रकार भवनाचे लोकार्पण
मुख्यमंत्री : १० लाखांचे अनुदान, पत्रकारांसाठी शासन सकारात्मक
अमरावती : राजापेठ येथील महापालिका संकुलात श्रमिक पत्रकार संघटनेद्वारा नवनिर्मित पत्रकार भवनाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात पार पडले.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खा. आनंदराव अडसूळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार सुनील देशमुख, रवी राणा, रमेश बुंदिले, अनिल बोंडे, महापौर चरणजितकौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, श्रमिक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवराय कुळकर्णी, चंद्रकांत जाजोदिया, संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
पत्रकारांचे आयुष्य दगदगीचे आणि आर्थिक स्थिती बेताची असते, या आयोजकांच्या प्रास्ताविकाशी सहमती दर्शवित या राज्य व्यवस्थेत पत्रकारांसाठी ठोस निर्णय घेतले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. चुकेल तिथे सरकारवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी पत्रकारांची आहेच. टिका देखील व्हायलाच हवी, त्याशिवाय प्रशासनरुपी अवजड हत्ती हलत नाही. तथापि नकारात्मक बातम्यांऐवजी आयुष्य फुलविणाऱ्या सकारात्मक बातम्यांवर भर द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आयोजकांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी श्रमिक पत्रकार संघटनेला १० लाख रुपये अनुदान जाहीर केले.
यावेळी पत्रमहर्षी स्व. बाळासाहेब मराठे जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित बिंब प्रतिबिंब या मराठी पत्रकारीतेवर आधारित संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक शिवराय कुळकर्णी, संचालन रवींद्र लाखोडे तर आभार प्रदर्शन संजय पाखोडे यांनी केले.
पालकमंत्री म्हणाले, ‘महान’ तर खासदार म्हणाले ‘बुद्धिवान’
मनोगतादरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘महान’ असा तर खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांचा उल्लेख ‘बुद्धिवान’ असा केला.
पत्रकारांबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका ठेवणारे नामदार प्रवीण पोटे यांनी या कार्यक्रमात हक्काने भावना व्यक्त केल्यात. बातम्या लिहिताना पत्रकारांनी दोन्ही बाजू जाणून घ्यायलाच हव्यात. अपुऱ्या माहितीच्या आधारे लिहिलेल्या बातमीमुळे गैरसमज होवू नयेत, याची काळजी घ्यावी.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार
पत्रकारीता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या काही ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यात प्रदीप देशपांडे, नानक आहुजा, शशिकांत ओहळे, सुरेश शुक्ला, मनोहर परिमल, अनिल जाधव, कुमार बोबडे, अरुण मंगळे, जितू दोषी, देवदत्त कुळकर्णी, नाना चौधरी यांचा समावेश होता. पत्रकार भवनाची वास्तू साकारणारे सुधीर कपाटे, नंदकिशोर काकडे यांचादेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.