परतवाड्यातील पांढऱ्या पुलाचे काम आजही रखडलेलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:32 IST2021-01-13T04:32:22+5:302021-01-13T04:32:22+5:30
नागरिक त्रस्त, नगर परिषदेचे दुर्लक्ष परतवाडा : स्थानिक पांढऱ्या पुलाचे काम ११ महिन्यांपासून रखडले आहे. याचा त्रास नागरिकांसह वाहनधारकांना ...

परतवाड्यातील पांढऱ्या पुलाचे काम आजही रखडलेलेच
नागरिक त्रस्त, नगर परिषदेचे दुर्लक्ष
परतवाडा : स्थानिक पांढऱ्या पुलाचे काम ११ महिन्यांपासून रखडले आहे. याचा त्रास नागरिकांसह वाहनधारकांना होत आहे. अस्तित्वात असलेल्या पुलाच्या अगदी नाकातोंडापर्यंत अतिक्रमण आले आहे.
अंजनगाव-परतवाडा-बैतूल (मध्यप्रदेश) सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. रस्ता दर्जा सुधार कार्यक्रमांतर्गत या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे. २७० कोटींहून अधिक खर्चाचा हा महामार्ग परतवाडा शहरातून रेस्ट हाऊस चौक, गुजरी, मिश्रा चौकातून गेला आहे. याच रस्त्यावर अगदी शहरात रेस्ट हाऊस चौकापुढे बिच्छन नदीवर हा पांढरा पूल आहे. जुना ब्रिटिशकालीन पूल म्हणून त्याची ओळख आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामातच या पांढऱ्या पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. या पांढऱ्या पुलावरून शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन गेली आहे. ही पाईप लाईन काढावी, इतरत्र शिफ्ट करावी, याकरिता १२ फेब्रुवारी २०२० ला रस्ते महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी अचलपूर नगरपालिकेला पत्र दिले. २४ ऑगस्ट २०२० ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून ही पाईप लाईन शिफ्ट करण्यास अचलपूर नगरपालिकेला तांत्रिक मंजुरी मिळाली. यावर १६ डिसेंबर २०२० ला राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना अचलपूर नगर परिषदेने पत्र दिले.
पांढऱ्या पुलावरील जलवाहिनी हटविण्याचे कामाचे आदेश निविदाधारकास देण्यात आले आहेत. जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम चालू करायचे आहे. यामुळे पुलाची लांबी व रुंदी आखून द्यावी. पुलाच्या दुसऱ्या बाजूने आपण काम सुरू करण्यास त्या पत्रात नगर परिषदेकडून सुचविले गेले आहे. या पत्रव्यवहारावरूनही २० दिवस उलटून गेले आहेत. या २० दिवसांतही ना कार्यकारी अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) यांनी नगर परिषदेला त्या पुलाची लांबी-रुंदी आखून दिली, ना नगर परिषदेने जलवाहिनी स्थलांतरास सुरुवात केली. आजही तो पांढरा पूल कामाच्या प्रतीक्षेत आहे.
कोट
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना १६ डिसेंबर २०२० ला पत्र देण्यात आले आहे. महामार्ग विभागाने पांढऱ्या पुलाची लांबी-रुंदी आखून दिल्यास जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम सुरू करण्यात येईल.
- मिलिंद वानखडे, अभियंता, नगर परिषद, अचलपूर.