परतवाडा ते चिखलदरा रस्त्याचे काम कंत्राटदाराने अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:39 IST2021-01-08T04:39:21+5:302021-01-08T04:39:21+5:30

नरेंद्र जावरे फोटो पी ०४ चिखलदारा रोड पान ३ चे लिड परतवाडा/चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाकडे ...

Work on the road from Paratwada to Chikhaldara was stopped by the contractor | परतवाडा ते चिखलदरा रस्त्याचे काम कंत्राटदाराने अडविले

परतवाडा ते चिखलदरा रस्त्याचे काम कंत्राटदाराने अडविले

नरेंद्र जावरे

फोटो पी ०४ चिखलदारा रोड

पान ३ चे लिड

परतवाडा/चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाकडे जाणारा मुख्य रस्ता दोन वर्षांपासून खड्डेमय झालेला आहे. त्या रस्त्याच्या बांधकाम वजा डागडुजीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने तीन महिन्यांपूर्वी परवानगीदेखील दिली. मात्र, संबंधित कंत्राटदाराने काम सुरू केले नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. परिणामी संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

धारणी व चिखलदरा तालुक्यात व्याघ्र प्रकल्पाची सीमारेषा वाढल्याने येथील रस्त्यांच्या कामासाठी संबंधित विभागाची परवानगी घ्यावी लागत आहे. त्यासाठी वर्षभरापासून मेळघाट ते मंत्रालय अशा बैठका झाल्या. अथक प्रयत्नानंतर परतवाडा, चिखलदरा ते घटांगपर्यंत होऊ घातलेल्या एकूण पाच टप्प्यातील रस्ता कामाला व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने प्रथम तीन टप्प्याची परवानगी तीन महिन्यांपूर्वी देण्यात आली. तरीसुद्धा संबंधित कंस्ट्रक्शन कंपनीने कामाला सुरुवातच केलेली नाही. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंपनीला वारंवार पत्र दिले. मात्र दिल्लीस्थित त्या कंपनीने त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागत आहे. ९५ कोटी रुपये खर्चाचे हे काम केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होणार आहे. दुसरीकडे या मुख्य कंपनीने कंत्राट घेऊन सबकॉन्ट्रॅक्टर नियुक्त केल्याचे माहिती आहे. तीन महिने होऊनसुद्धा संबंधित कंपनी काम सुरू करत नसेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करीत दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करण्याची मागणी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी केली आहे.

बॉक्स

दोन टप्प्याची परवानगी अडकली

तीन महिन्यांपूर्वी व्याघ्रप्रकल्पाच्यावतीने तीन टप्प्यातील रस्ता बांधणीला परवानगी दिली. मात्र, दोन टप्प्यातील परवानगीची फाईल वन मंत्रालयात अडकून पडली आहे. मेळघाटातील आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न पाहता तात्काळ ती निकाली काढण्याची मागणी होत आहे.

कोट

परतवाडा चिखलदरा रस्त्याच्या तीन टप्प्यातील कामाला तीन महिन्यांपूर्वी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने परवानगी देण्यात आली. मात्र, संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीने कामाला सुरुवात केली नाही. त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

- मिलिंद पाटणकर,

उपविभागीय अभियंता

सा. बां. विभाग, चिखलदरा

---------------

Web Title: Work on the road from Paratwada to Chikhaldara was stopped by the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.