निधीअभावी रखडले गडगा प्रकल्पाचे काम
By Admin | Updated: January 30, 2016 00:18 IST2016-01-30T00:18:39+5:302016-01-30T00:18:39+5:30
विदर्भातील सिंचनाचा अनुशेष सातत्याने वाढत असल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे.

निधीअभावी रखडले गडगा प्रकल्पाचे काम
सिंचनाचा बोजवारा : शेतजमीन खरेदी करून लोटले चार वर्षे
धारणी : विदर्भातील सिंचनाचा अनुशेष सातत्याने वाढत असल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शेतकरी आत्महत्येचे लोण आता मेळघाटातही पोहोचू पाहात आहे. मेळघाटात तर सिंचनाचा पुरता बोजवारा उडाला असून जे प्रकल्प पूर्णत्वास गेले त्यातून एक थेंब पाणी सिंचनासाठी मिळालेले नाही.
तालुक्यातील पहिले मध्यम प्रकल्प म्हणून कावरा प्रकल्प दहा वर्षांपूर्वी उदयास आले. या सिंचन प्रकल्पात भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे कावरा प्रकल्पाचे कालवे सिंचनहीन बनले आहे. म्हणून शासनाचे कोट्यवधी रूपये प्रकल्पाच्या नावावर पाण्यात गेले.
अशाच प्रकारे चार वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तालुक्यातील माणसुधावडी येथे गडगा प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. संथगतीने सुरू असलेल्या या प्रकल्पावर शासनाकडून निधीच उपलब्ध करून दिला नसल्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचेही भविष्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न भंगले आहे. तालुक्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणून आकारास येत असलेला गडगा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार होता. अशा भुलथापा देऊन सिंचन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प दरात बळकावल्या होत्या. जमिनीही गेल्या व हाती आली बेरोजगारी, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्या आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान होत आहे. पहाडपट्ट्यात सिंचनाचा प्रश्न बिकट असताना राज्य शासन सिंचन निधी उपलब्ध करून देत नाही म्हणून भाजपला मतदान करून मेळघाटवासी चुकले तर नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आदिवासी शेतकरी व्यक्त करू लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)