कामापूर्वीच कंत्राटदाराला देयक प्राप्त
By Admin | Updated: March 14, 2015 00:43 IST2015-03-14T00:43:57+5:302015-03-14T00:43:57+5:30
स्थानिक नगरपरिषदेंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या निकृष्ट बांधकामाची तक्रार तीन नगरसेवकांसह ३९ नागरिकांनी केल्यानंतरही प्रशासनाने याची दखल घेतली नाही.

कामापूर्वीच कंत्राटदाराला देयक प्राप्त
सुरेश सवळे चांदूरबाजार
स्थानिक नगरपरिषदेंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाच्या निकृष्ट बांधकामाची तक्रार तीन नगरसेवकांसह ३९ नागरिकांनी केल्यानंतरही प्रशासनाने याची दखल घेतली नाही. शिवाय कंत्राटदाराच्या दबावाखाली येऊन डांबरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच कंत्राटदाराला या कामाची ३२ लक्ष ९२ हजार ६७ रुपयांची रक्कम अदा केली.
या निकृष्ट रस्त्याचे डांबर ठिकठिकाणी उखडले असून रस्त्यावर नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिक्षण सभापती गोपाल तिरमारे व काँग्रेसचे नगरसेवक एजाज अली मुशरफअली यांनी करुन चौकशीची मागणी केली आहे. २८ मार्चनंतर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी आ. बच्चू कडू, जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.
तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून वॉर्ड क्र. २ मधील डॉ. आंबेडकर बालोद्यानापासून गाडगेबाबा मंदिरापर्यंत व पुढे जुना कोंडवाड्यापर्यंत डांबरीकरणाचे कामाला मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांनी तांत्रिक मंजुरी प्राप्त केली. या कामाच्या ई-निविदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्यानंतर या कामाचे कंत्राट मोर्शीच्या कंत्राटदाराला देण्यात आला. हे काम अंदाजपत्रक दराच्या ८.९७ टक्के अधिक दराने देण्यात आले, हे विशेष! या कामाची एकूण अंदाजित किंमत ३४ लक्ष १८ हजार ७४० असून यात १३ लक्ष ५५ हजार ९२० रुपयांच्या रनिंग बिलाची रक्कम कंत्राटदाराला १ आॅक्टोबर २०१४ रोजी प्रदान करण्यात आली. या कामाचे दुसरे रनिंग बिल ३० लक्ष २१ हजार ७७ चे तयार करण्यात आले होते. मात्र सदर काम अंदाजपत्रक दराने ८.९० टक्के अधिक दराने देण्यात आल्यामुळे कंत्राटदाराला २ लक्ष ७० हजार ९९० रुपये अतिरिक्त देण्यात आले. करांची रक्कम कपात करुन पालिका प्रशासनाने कंत्राटदाराला १६ लक्ष ३९ हजार ९१८ रुपये काम पूर्ण होण्याआधीच (२२ डिसेंबर २०१४) देण्यात आले. बांधकाम अभियंत्याने लेखापाल अंतर्गत लेखा परीक्षक, विभागप्रमुखांच्या माध्यमातून एम.बी. रेकॉर्ड तयार करुन देयक प्रदान करताना सादर करावयाचे विवरणपत्र व इतर दस्तऐवजदेखील त्याच दिवशी तयार केले. १६ लक्ष ३९ हजार ९१८ रुपयांचा धनादेश कंत्राटदाराला रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच प्रदान केला, असा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. काम सुरू असतानाच २४ डिसेंबर २०१४ रोजी परिसरातील २९ नगरसेवकांनी निकृष्ट कामबंद करण्याची तक्रार मुख्याधिकारी व तहसीलदारांकडे केली होती. नगरसेविका लविना आकोटकर यांनीही तक्रार केली.