वनमजुराने पकडलेला लाकडाचा ट्रक पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST2021-06-01T04:10:40+5:302021-06-01T04:10:40+5:30
अचलपूर,अंजनगाव,परतवाडा, चांदूर बाजारात लागले ढीग अनिल कडू परतवाडा : वनमजुराने पकडलेला अवैध आडजात लाकडाचा ट्रक डोळ्यादेखत ३० मे रोजी ...

वनमजुराने पकडलेला लाकडाचा ट्रक पळाला
अचलपूर,अंजनगाव,परतवाडा, चांदूर बाजारात लागले ढीग
अनिल कडू
परतवाडा : वनमजुराने पकडलेला अवैध आडजात लाकडाचा ट्रक डोळ्यादेखत ३० मे रोजी चालकाने पळविला. परतवाडा वनपरिक्षेत्र अंतर्गत तामसवाडी शिवारात हिरव्यागार बाभळीसह इतर आडजात लाकडांची, वृक्षांची अवैध कटाई लाकूड तस्करांनी केली. याची माहिती वनमजूर सुरेश गुळसुंदरे यांना मिळाली. तेव्हा ते ३० मे रोजी घटनास्थळी दाखल झालेत. तेथे ट्रक क्रमांक एमएच २७ बी एक्स १२९९ मध्ये ती लाकडे भरणे सुरू होते. तेव्हा ट्रकचालकाकडे कुठलाही वैध दस्तऐवज, परवाना, वाहतूक पास नव्हती.
यावर घटनास्थळावरूनच गुळसुंदरे यांनी वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. मदतही मागितली. वनविभागाच्या मोबाईल पथकातील अधिकाऱ्यालाही याची माहिती दिली. पण यात त्यांना यश आले नाही.
पळून गेलेला तो ट्रक वनमजूर गुळसुंदरे यांना ३१ मे रोजी अंजनगाव परिसरात आंब्याची लाकडे ट्रकमध्ये घेऊन दिसला. याची माहिती वनरक्षकास दिली. पण, वनरक्षकाने याची दखल घेतली नाही.
बॉक्स
हिरव्या झाडांची कत्तल
परतवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत अचलपूर, परतवाडा, अंजनगाव, दर्यापूर शेत शिवारात, परिसरात हिरव्यागार मोठ्या आडजात झाडांची कत्तल होत आहे. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या डोळ्यांदेखत ही वृक्षतोड होत आहे.
आडजात लाकडाचे ढीग
अवैधरीत्या तोडल्या गेलेल्या या आडजात लाकडाचे ढीग अचलपूर, परतवाडा, चांदूर बाजार, अंजनगावात पडून आहेत. बाभूळ, कडूनिंब, आंबा यासह अन्य झाडांची ती लाकडे आहेत. ही लाकडे मोठ्या ट्रकमध्ये भरून जिल्ह्याच्या बाहेर आणि परराज्यात पाठविले जात आहेत.
कोट
वनमजुराने पकडलेला अवैध आडजात लाकडाचा ट्रक पळून गेला. या ट्रकचा शोध घेण्यात येईल. संबंधितांवर कारवाई होईल.
- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा
कोट
अवैध वृक्ष कटाईतील लाकडे पळून नेणाऱ्या ट्रकविरुद्ध आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येत आहे.
- प्रदीप बाळापुरे, वनरक्षक
दि 31/5/21 /फोटो