अचलपूर नगरपालिकेत महिलांचा ठिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST2021-07-27T04:14:11+5:302021-07-27T04:14:11+5:30
परतवाडा : स्थानिक माता महाकालीनगर वाॅर्ड ८ परिसरातील रहिवाशांना नगरपालिकेने रस्ते, नाल्या, घरकुल, सार्वजनिक संडास, घर टॅक्ससह मूलभूत सुविधा ...

अचलपूर नगरपालिकेत महिलांचा ठिया
परतवाडा : स्थानिक माता महाकालीनगर वाॅर्ड ८ परिसरातील रहिवाशांना नगरपालिकेने रस्ते, नाल्या, घरकुल, सार्वजनिक संडास, घर टॅक्ससह मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, या मागणीकरिता तेथील महिलांनी सोमवारी अचलपूर नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान अतिक्रमण नियमानुकूल करण्याची मागणीही तेथील महिलांनी केली.
मोठ्या प्रमाणात महिला आपल्या मागण्या घेऊन सोमवारी ११ च्या सुमारास अचलपूर नगरपालिकेत दाखल झाल्या. मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर त्या जमल्या. त्यांनी प्रचंड नारेबाजी केली. नगरपालिका प्रशासनासही त्यांनी धारेवर धरले. जवळपास दोन तास त्यांनी आपले हे धरणे आंदोलन सुरू ठेवले. या आंदोलनात पुरुषही सहभागी झाले होते. वर्षभरापासून मागण्यांकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे महिला अधिकच संतप्त झाल्या. नगरपालिका प्रशासनाकडून लेखी घेतल्याशिवाय मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षा समोरून उठायचे नाही. असा निर्णयच त्यांनी जाहीर केला. यादरम्यान पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता.
अखेर प्रशासनाने त्यांचे निवेदन स्वीकारले व त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना लिखित दिले. नझूल विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावाची प्रतही नगर परिषद प्रशासनाने त्यांना दिली. समस्या निकाली काढण्याचे आश्वासनही याप्रसंगी दिले गेले.