मांस, दारुविक्रीवरून दोन तास महिलांचा गोंधळ
By Admin | Updated: December 16, 2015 00:08 IST2015-12-16T00:08:42+5:302015-12-16T00:08:42+5:30
जुन्या बायपासलगतच्या जलारामनगरातील एका संकुलात सुरू असलेले मांस व दारुविक्रीचे दुकान बंद करण्यासाठी मंगळवारी परिसरातील महिलांनी दोन तास ...

मांस, दारुविक्रीवरून दोन तास महिलांचा गोंधळ
अमरावती : जुन्या बायपासलगतच्या जलारामनगरातील एका संकुलात सुरू असलेले मांस व दारुविक्रीचे दुकान बंद करण्यासाठी मंगळवारी परिसरातील महिलांनी दोन तास गोंधळ घातला. परिस्थिती चिघळत असताना घटनास्थळी पोलीस पथक आणि महापालिकेची चमू दाखल झाली. मांसविक्रीचे दुकान तत्काळ बंद करून महिलांची मागणी पूर्ण करण्यात आली.
मागील पाच-सहा महिन्यांपूर्वी परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना निवेदन देऊन हे मांसविक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार हे दुकान हटविण्याबाबतच्या सूचना पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांना दिल्या होत्या. मंगळवारी मांसविक्रीचे दुकान बंद करण्यासाठी महापालिका चमू पोहोचली असताना मांसविक्रेत्यांनी दुकान बंद करण्यास विरोध दर्शविला. दरम्यान महिलांचा जमाव एकत्र आला. मांसविक्रीसोबत दारुविक्रीचे दुकानही हटविण्याची मागणी महिलांनी केली. आक्रमक झालेल्या महिलांनी गोंधळ घातल्याने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. फ्रेजरपुरा पोलिसांसह कंट्रोलरुमचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. महिलांनी जोरदार नारेबाजी केली.