सिंभोऱ्यातील दारूमुक्तीसाठी महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:18+5:302021-04-05T04:12:18+5:30
पोलीस ठाण्यात धाव, ठरावाला मंजुरी मोर्शी : सिंभोरा येथे खुलेआम सुरू असलेली अवैध दारूविक्री त्वरित बंद करण्यात यावी. ...

सिंभोऱ्यातील दारूमुक्तीसाठी महिलांचा एल्गार
पोलीस ठाण्यात धाव, ठरावाला मंजुरी
मोर्शी : सिंभोरा येथे खुलेआम सुरू असलेली अवैध दारूविक्री त्वरित बंद करण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी शेकडो महिला-पुरुष शनिवारी मोर्शी पोलीस ठाण्यात धडकले. ग्रामपंचायतीमार्फत सिंभोरा गावात संपूर्ण दारूबंदी व्हावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसे निवेदन मोर्शीच्या ठाणेदारांना देण्यात आले.
सिंभोरा येथे प्रसिद्ध अप्पर वर्धा धरण असून, देशभरातील पर्यटक धरण बघण्याकरिता याठिकाणी नेहमीच गर्दी करीत असतात. त्यामुळे सिंभोरा गावाच्या रस्त्यावरच विविध प्रकारची दुकाने थाटली आहेत. या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी शहरात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणे-येणे करतात. या गावातील काही नागरिक अवैध देशी दारूच्या पेट्या आणून त्याची विक्री करीत आहे. इतकेच नव्हे तर तळीरामांना घरपोच दारू विक्रीचा गोरखधंदा फोफावला आहे. गावातील काही तळीराम दारू ढोसून नेहमीच भांडण-तंटे करीत आहे. त्यामुळे आता महिलांचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी ग्रामपंचायतीमार्फत दारूबंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर केला. त्याअनुषंगाने पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर अंकुश लावून कठोर कारवाई करून सिंभोरा गाव दारूमुक्त करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना सरपंच प्रफुल्ल उमरकर, उपसरपंच प्रीती मोंढे, सदस्य चेतन घाटोळे, पुरुषोत्तम देवताळे, मंगला काकडे, मालती धुर्वे, वर्षा सोनारे, महिला गटाच्या अनिता भोयर, स्वाती धवणे, मीना काळे, भारती शेंद्रे, कल्पना धुर्वे, रेखा नेवारे, मंजूषा उमरकर, नीता काकडे, दीपाली ठाकरे, विशाखा मडावी, अर्चना गेडाम, कविता कंगाले, सुनंदा भास्करे, माधुरी भोकरे, कुसुम देवहाते, चांदनी भोयर, मनीषा नेहारे, सुभद्रा भोयर, नीता नेहारेसह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते.