महिला लोकशाही दिन फक्त नावापुरता
By Admin | Updated: June 27, 2015 00:14 IST2015-06-27T00:14:48+5:302015-06-27T00:14:48+5:30
महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल विकास खात्याच्या २०१३ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक तहसील कार्यालयास महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्याचा आदेश आहे.

महिला लोकशाही दिन फक्त नावापुरता
अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ : तीनच विभागांचा सहभाग
प्रभाकर भगोले चांदूररेल्वे
महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल विकास खात्याच्या २०१३ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक तहसील कार्यालयास महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्याचा आदेश आहे.
२२ जून रोजी तहसील कार्यालयात महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. परंतु त्या महिला लोकशाही दिनात एकही तक्रार दाखल झाली नसली तरी वरिष्ठ खात्याचा सहभाग असणाऱ्या अधिकाऱ्यांनीही गैरहजर राहून उदासीनता दाखविली. तीनच विभागांची या लोकशाही दिनात हजेरी होती. पण अधिकाऱ्यांनी न येता कारकूनी केली. महिला लोकशाही दिनी २२ जून रोजी तहसील प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण रुग्णालय, विद्युत विभाग, पंचायत समिती, राज्य परिवहन, वन पाटबंधारे, भूमिअभिलेख, सामाजिक वनिकरण विभागाला हजर राहण्याबाबत अधिकाऱ्यांना लेखी आदेश दिल्याची माहिती आहे. शासनाकडून प्रत्येक तहसील कार्यालयात तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनात महिलाच्या तक्रारींची दखल घेतली जाते. यासाठी तक्रारी करणे आवश्यक आहे. याची ठळक प्रसिध्दी शासनाकडून होत नसल्याने अन्यायग्रस्त महिला या लोकशाही दिनाबद्दल अनभिज्ञ आहेत. त्याचबरोबर अधिकारी हजर राहत नाही.
कारण याप्रमुख विभागाचे अधिकारी अमरावतीहून चांदूररेल्वेचा कार्यभार पाहतात आणि अमरावती येथे संबंधित शासकीय सभा असली तर चांदूररेल्वे ते अमरावती असा प्रवास भत्ता काढला जातो, अशी सर्वच विभागाची स्थिती असल्याने लोकशाही दिनात अधिकाऱ्यांची नेहमीच अनुपस्थिती राहत असल्याची चर्चा आहे. महिला लोकशाही दिनात तक्रारी नसल्या तरी अधिकारी वर्ग पाठ फिरवीत असल्याची नेहमीची पध्दत झाल्याने महिला लोकशाही दिन फक्त फार्स ठरला आहे.