दारुबंदीसाठी सरसावल्या धारणीतील महिला
By Admin | Updated: September 14, 2014 23:47 IST2014-09-14T23:47:21+5:302014-09-14T23:47:21+5:30
स्थानिक वॉर्ड क्र. ३ मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारुचा व्यवसाय फोफावल्याने याविरुध्द महिलांनी एल्गार पुकारला आहे. दारुबंदीसाठी सुमारे ५० महिलांनी पोलीस ठाण्यात धडक देऊन अवैध व्यावसायिकांवर

दारुबंदीसाठी सरसावल्या धारणीतील महिला
धारणी : स्थानिक वॉर्ड क्र. ३ मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारुचा व्यवसाय फोफावल्याने याविरुध्द महिलांनी एल्गार पुकारला आहे. दारुबंदीसाठी सुमारे ५० महिलांनी पोलीस ठाण्यात धडक देऊन अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले.
याची गंभीर दखल घेत स्वत: ठाणेदार शरद इंगळे यांनी लगेच सायंकाळी सुधाकर चव्हाण, प्रीती ताठे यांना सोबत घेऊन वॉर्डातच बैठक घेतली. गाऱ्हाणी ऐकली व भविष्यात असे प्रकार घडणार नाही याची हमी घेत जनतेला पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. १३ सप्टेंबर रोजी ग्रा.पं. सदस्य कमल ठाकूर यांच्या नेतृत्वात सुमारे ५० महिलांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यांनी वॉर्ड क्र. ३ मध्ये सुरु असलेल्या अवैध दारु विक्रीवर निर्बंध घालण्याबाबतचे लेखी निवेदन ठाणेदार शरद इंगळे यांना दिले. ठाणेदारांनी लगेच सर्व महिलांना 'सायंकाळी वॉर्डात येतो. आपण येथे आपली बाजू नि:संकोचपणे मांडा', असे आवाहनही केले. लोकांनीही ठाणेदारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरकारी विहिरीजवळ तत्काळ बैठक भरविली. यात ठाणेदारांची उपस्थिती पाहता लोकांनी मनमोकळेपणाने आपली व्यथा मांडली. पोलीस आपल्या पाठीशी आहे. आपण दारुबंदीच्या दिशेने उचललेल्या पावलास आम्ही पूर्ण सहकार्य करु, अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करताना आपले सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. युवापीढी दारुच्या आहारी गेल्याने अनेक घरे दारुमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. अलीकडच्या काळात व्यसनामुुळे सात जणांनी आत्महत्या केल्याची माहिती याप्रसंगी कमल ठाकूूर यांनी दिली.(तालुका प्रतिनिधी)