महापालिकेतील महिला कर्मचारी 'सेफ झोन'मध्ये
By Admin | Updated: August 15, 2016 00:02 IST2016-08-15T00:02:11+5:302016-08-15T00:02:11+5:30
राजधानी दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर राज्यभरात महिला तक्रार निवारण समिती नव्याने ठिकठिकाणी कार्यान्वित करण्यात आल्यात.

महापालिकेतील महिला कर्मचारी 'सेफ झोन'मध्ये
अध्यक्ष बदलल्या : विशाखा समितीकडे केवळ एक तक्रार
अमरावती : राजधानी दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर राज्यभरात महिला तक्रार निवारण समिती नव्याने ठिकठिकाणी कार्यान्वित करण्यात आल्यात. त्यांना विशाखा समिती, असे नाव देण्यात आले. प्रत्येक शासकीय कार्यालयात विशाखा समिती नेमणे बंधनकारक केले. त्यानुसार महापालिकेतही विशाखा समितीचे गठन करण्यात आले. या समितीकडे दोन वर्षांत केवळ दोनच तक्रारी आल्याने महापालिकेतील महिला कर्मचारी सेफ झोनमध्ये असल्याचे सुखद वास्तव समोर आले.
सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांच्याकडे विशाखा समितीचे अध्यक्षपद होते. त्यांनी सुमारे दीड वर्ष ही धुरा सांभाळली.त्यांच्या कार्यकाळातच या समितीकडे दोन तक्ररी दाखल झाल्या. त्यापैकी एक तक्रार प्रशासकीय बाबीत मोडणारी असल्याने ती संबंधितांकडे वर्ग करण्यात आली. त्याअनुषंगाने तक्रारकर्त्या कर्मचाऱ्यासह ज्या अधिकाऱ्यांवर आरोप आहेत, त्यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र घोंगे यांची बदली झाल्याने त्या चौकशीला ब्रेक बसला आहे. नवनियुक्त अध्यक्ष सुषमा ठाकरे यांच्या मते त्या एकमेव तक्रारीची चौकशीही अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेतील महत्त्वपूर्ण खुर्चीवर बसलेल्या एका अधिकाऱ्यांविरुध्द ती तक्रार आहे. तो विशिष्ट अधिकारी आपल्याकडे वाईट नजरेचे पाहत असल्याची ती तक्रार होती. तो अधिकारी चौकशीला सहकार्य करीत नव्हता. त्यामुळे या चौकशीत व्यत्यय आला. मात्र तीही चौकशी आता अंतिम टप्प्यात आली आहे. एकंदरितच दोन वर्षांत विशाखा समितीकडे महिला कर्मचाऱ्यांकडून केवळ २ तक्रारी आल्या आहेत.त्यामुळे अंबानगरीच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला कर्मचारी बिनधास्तपणे काम करीत असल्याची जाणीव अधिक बळकट झाली आहे.
सुषमा ठाकरेंकडे अध्यक्षपद, तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी प्रतिभा आत्राम यांच्याकडे आहे. सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिक प्रतिभा घंटेवार या समितीच्या सदस्य सचिव आहेत. महिला व बालविकास अधिकारी नरेंद्र वानखडे, जनसंपकर अधिकारी भूषण पुसदकर सहायक शिक्षिका वैशाली कुऱ्हेकर,लघुलेखक सुनीता गुर्जर, कनिष्ट लिपिक शीतल राऊत आणि लिना आकोलकर या सदस्या आहेत. (प्रतिनिधी)
फलकावर घोंगेच अध्यक्ष
महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या पोर्च जवळ महिला तक्रार निवारण समिती -विशाखा समितीचा फलक लावण्यात आला आहे. या फलकावर अध्यक्षांसह समिती सदस्यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र घोंगे यांची बदली होऊन तीन महिने उलटत असताना त्यांचेच नाव अध्यक्षपदी कायम आहे. विशेष म्हणजे समितीतील काही सदस्य नव्या अध्यक्षांच्या नावाबाबत अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुषमा ठाकरेंकडे अध्यक्षपदाचे सुकाणू
मावळत्या अध्यक्ष प्रणाली घोंगे यांची बदली झाल्यानंतर अध्यक्षपदाची धुरा महापालिकेच्या क्षय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेल्या सुषमा ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी नुकतेच या पदाची सूत्रे हाती घेतली असून समिती सदस्यांसह बैठकही घेण्यात आली आहे. माहापालिकेत कंत्राटी सेवा देणाऱ्या एका अधिकाऱ्यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारींचे त्यांना निकाल लावणे अगत्याचे ठरणार आहे.