अवैध दारूविक्रेत्याला महिलांनी झोडपले
By Admin | Updated: September 22, 2014 23:11 IST2014-09-22T23:11:43+5:302014-09-22T23:11:43+5:30
नजीकच्या खेड या गावातील अवैध दारुविक्रेत्याला गावकरी महिलांनी बांधून ठेवले व बेदम मारझोड केली. याप्रकरणी दारुविक्रेता आणि मारझोड करणाऱ्या महिलांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आहेत.

अवैध दारूविक्रेत्याला महिलांनी झोडपले
खेड येथील घटना : दारूविक्रेत्यासह महिलांवरही गुन्हे
मोर्शी : नजीकच्या खेड या गावातील अवैध दारुविक्रेत्याला गावकरी महिलांनी बांधून ठेवले व बेदम मारझोड केली. याप्रकरणी दारुविक्रेता आणि मारझोड करणाऱ्या महिलांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आहेत.२० सप्टेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
खेड गावात अवैधरित्या दारुविक्री होत असल्याची ओरड आहे. तशा तक्रारी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकासोबतच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मोर्शी पोलीस ठाण्यातर्फे सातत्याने धाडी टाकून अवैध दारूविक्रीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतरही दारुविक्री सुरू असल्याची ओरड आहे. त्यामुळे दारुबंदीच्या निर्धाराने गावातील काही महिला सक्रीय झाल्या. २० सप्टेबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास गावातील महिलांनीदारु विकणाऱ्या ओंकार मनोहरे याला १०० रुपये किमतीच्या २ लीटर दारुसह पकडले. त्याला जबर मारहाण केली आणि बांधून ठेवले. यावेळी घटनास्थळी मोठया प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती.
घटनेची माहिती मिळाल्यावर मोर्शीचे सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक बावनकर, हेकाँ प्रभाकर पाचघरे, देविदास शेंडे, नापोकॉ मनोज टप्पे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बांधून ठेवलेल्या जखमी ओंकार मनोहरेची सुटका केली आणि त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरुध्द दारुबंदी कायद्याच्या कलम ६५ (ड) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. महिलांच्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या ओंकार मनोहरे याला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओंकार मनोहरे याच्या तक्रारीवरुन त्याला बेदम मारझोड करणाऱ्या प्रभा वानखडे, सरला तंबाखे, शकुनी पाटील, विमला तंबाखे यांच्या विरुध्द पोलिसांनी भादंविच्या कलम ३४२, ३२३, ३२४, ५०४ (३४) प्रमाणे गुन्हा नोंदविला असून तपास सुरू केला आहे. गावात दारु पिऊन येणाऱ्यांविरुध्द सुध्दा महिलांनी एल्गार पुकारल्याची चर्चा आहे. महिलांच्या आक्रमकतेचा दबक्या स्वरात काहींनी विरोधही केला.