A woman without head found | मुंडके छाटलेले महिलेचे धड आढळले
मुंडके छाटलेले महिलेचे धड आढळले

ठळक मुद्देखळबळ : चांदुरी शिवारातील घटना, शरीरावर अनेक जखमा

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा/अमरावती : महिलेच्या हत्येनंतर शिर धडावेगळे करून मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी चांदुरी रिंगरोडजवळील एका शेतात उघडकीस आली. मृत महिला ३५ वर्षे वयोगटातील असून, तिची अद्याप ओळख पटलेली नाही. विशेष म्हणजे महिलेची शिर विहिरीत आढळून आले नाही. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
चांदुरी रिंंगरोडवरील संजय नरेंद्र टावरी यांच्या शेतातील विहिरीमध्ये मंगळवारी सायंकाळी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती बडनेरा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून विहिरीची पाहणी केली. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे मृतदेह बुधवारी सकाळी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सकाळी बडनेरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुदाम आसोरे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अग्निशमनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असता, मृत महिलेचे शिर गायब असल्याचे आढळून आले. मृतक महिलेच्या पोटावर, छातीवर व मांडीवर धारदार शस्त्राने वार केले होते. महिलेची हत्या करून तिचे शिर धडावेगळे केले आणि मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्याचा पोलिसांचा कयास आहे. चेहरा नसल्याने तिची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी आजूबाजूच्या गावांमध्ये चौकशी सुरू केली. अद्याप कुठलीही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तूर्तास बडनेरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ (हत्या) व २०१ (पुरावा नष्ट) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

आठ ते दहा दिवसांपूर्वी
मृत्यू झाल्याचा संशय
महिलेचा कुजलेला मृतदेह विहिरीत पालथा व नग्न अवस्थेत आढळून आला आहे. महिलेचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आरोपीने महिलेची हत्या करून तिचे शिर धडापासून वेगळे करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ते गायब केल्याचा संशय पोलिसांना आहे.

हत्या करून महिलेचा मृतदेह विहिरीत आणून टाकल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी मृताचे शिर धडावेगळे केले. ते घटनास्थळी आढळले नाही. अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा व पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.
- यशवंत सोळंके
पोलीस उपायुक्त.

शिर शोधण्यासाठी विहीर उपसणार
चांदुरी स्थित शिवशंकरनगरातील प्रथमेश विहार येथे संजय नरेंद्र टावरी यांंचा प्लॉट असून, त्या प्लॉटमधील विहिरीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडेझुडुपे वाढलेली आहेत. याच विहिरीत महिलेचे निर्वस्त्र धड आढळून आले. त्या अनोळखी महिलेचे शिर विहिरीच्या तळाशी असावे, असा कयास पोलिसांचा आहे. त्या अनुषंगाने अग्निशमन दलाचे अधीक्षक एन.आर. मिठे, फायरमन प्रेमानंद कांबळे, अलोडे, मोहोड, महल्ले व वाहनचालक देवकर यांच्या चमूकडून विहिरीतील पाणी मशीनद्वारे उपसून घेतले जाणार आहे.
 

Web Title: A woman without head found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.