-तर ट्रकखाली चिरडली असती विद्यार्थिनी
By Admin | Updated: September 3, 2016 00:10 IST2016-09-03T00:10:33+5:302016-09-03T00:10:33+5:30
गुरूवारी सकाळी ७ वाजताची वेळ. पोळा असल्याने तिवसा तालुक्यातील संपूर्ण शाळा सकाळच्या सत्रात होत्या.

-तर ट्रकखाली चिरडली असती विद्यार्थिनी
अपघात टळला : स्थानकाबाहेरच थांबतात बसेस
गुरुकुंज (मोझरी) : गुरूवारी सकाळी ७ वाजताची वेळ. पोळा असल्याने तिवसा तालुक्यातील संपूर्ण शाळा सकाळच्या सत्रात होत्या. शाळेत जाण्याकरिता तिवसा येथील दंडाळे महाविद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी बसस्थानकावर उभी होती. मात्र, बसचालकाने स्थानकाबाहेर बस थांबविल्याने रस्ता ओलांडून बसकडे जाताना भरधाव ट्रकखाली विद्यार्थिनी चिरडली जाणार, तोच शिक्षकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला.
गुरुकुंजातील रहिवासी मुलगी सकाळी ६.५५ वाजता तिवसा येथे शाळेला जाण्याकरिता बसच्या प्रतीक्षेत उभी होती. अमरावती- नागपूर बस गुरूकुंज मोझरी येथे पोहोचली. पण चालकाने बस स्थानकाबाहेर महामार्गालगतच उभी केली. बस पकडण्यासाठी रस्ता ओलांडून जात असताना भरधाव ट्रक विद्यार्थिनीला धडक देणारच होता. तेवढ्यात तेथे उपस्थित एका शिक्षकाने ओरडून विद्यार्थिनीला रोखले आणि भयंकर घटना टळली.
या स्थानकावर हा प्रकार नित्याचा झाला आहे. बस स्थानकात न येता महामार्गालगतच थांबतात. त्यामुळे विद्यार्थी धावपळ करीत रस्ता ओलांडून बस पकडण्याचा प्रयत्न करतात.अशा वेळी भयंकर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी तिवसा पोलिसांनी वाहतूक शिपायाची नियमित नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. गुरुकुंज मोझरी परिसरातील वाहतूक प्रचंड अनियंत्रित झाली असून अरुंद रस्त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. परिसरातील आठ गावांची सुरक्षा आज तिवसा पोलिसांच्या आवाक्या बाहेर गेल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
बस स्थानकाजवळ वाहतूक शिपाई हवा
राष्ट्रीय महामार्गावर गुरुकुंज हे गाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आश्रम, शाळा-महाविद्यालय आहे. याठिकाणी वाहनांची नेहमी वर्दळ असते तसेच भाविक व विद्यार्थी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी येथे वाहतूक शिपायाची नियुक्ती व्हावी.