ग्रामीण रुग्णालयातून परत आलेल्या महिलेची वाटेत प्रसूती
By Admin | Updated: July 26, 2015 00:44 IST2015-07-26T00:44:30+5:302015-07-26T00:44:30+5:30
प्रसूती वेदना होत आहे म्हणून ग्रामीण रुग्णालयात आलेल्या गर्भवती महिलेला ‘तुझं हे रोजचंच नाटक आहे’ असे म्हणून परिचारिकेने त्या महिलेला घरी परत पाठविले.

ग्रामीण रुग्णालयातून परत आलेल्या महिलेची वाटेत प्रसूती
चांदूररेल्वे : प्रसूती वेदना होत आहे म्हणून ग्रामीण रुग्णालयात आलेल्या गर्भवती महिलेला ‘तुझं हे रोजचंच नाटक आहे’ असे म्हणून परिचारिकेने त्या महिलेला घरी परत पाठविले. मात्र तिची प्रसूतीची वेळ आल्याने वाटेतच भर पावसात प्रसूती झाल्याची घटना शुक्रवारी चांदूररेल्वे येथे घडली.
जननी सुरक्षा योजनेंतर्गत महिलांना प्रसूतीसाठी विविध योजना शासनाच्यावतीने राबण्यात येत आहेत. परंतु त्या योजनेचा लाभ देणे तर सोडा परंतु प्रसूती वेदनेने विव्हळत असलेल्या शुभांगी जितेश उडाण (२४) ह्या महादेव घाट परिसरात राहणाऱ्या महिलेला रात्री दवाखान्यात आली म्हणून भरती करून घेतले नसल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी परिचारिकेने केला असल्याचा आरोप गर्भवती महिला व तिच्या पतीने केला. प्रसूती वेदना होत आहे म्हणून शुभांगी उडाण व तिचे पती येथील ग्रामीण रुग्णालयात गेले होते. त्यावेळी वैद्यकीय अधीक्षक लिना भुतडा यांनी तिची तपासणी केली. तेव्हा तिची प्रसूती होऊ शकते असे त्यांच्या लक्षात आले होते. त्या दरम्यान डॉ. भुतडा ह्या घरी गेल्या असता तेथील ड्युटीवर हजर नर्स श्रीमती सीमा देशमुखने शुभांगीला भरती करून घेण्यास नकार दिला व तुला अजून वेळ असल्याचे सांगितले. गर्भवती महिलेने वारंवार विनंती करूनही नर्सने तिला वापस जाण्यास सांगितले. यावरून ती महिला व तिचा पती घरी आले. तेव्हा वेदना सुरूच होत्या. त्याच दरम्यान घरी अंगणात त्या महिलेची प्रसूती झाली. घराशेजारील महिलांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शुभांगीची प्रसूती केली. प्रसूती सुखरुप झाली असली तरी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. (तालुका प्रतिनिधी)