शिरजगाव बंड येथे महिलेची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST2020-01-18T06:00:00+5:302020-01-18T06:00:28+5:30
पोलीस सूत्रांनुसार, संगीता विकास झटाले (४५, रा. शिरजगाव बंड) असे मृत महिलेचे नाव आहे. शेजारी राहणारी महिला घरात रक्तबंबाळ स्थितीत पडली असल्याची माहिती शिरजगाव बंड येथील प्रशांत कुरळकर यांनी चांदूर बाजार पोलिसांना दिली. त्यावरून ठाणेदार उदयसिंह सोळंके यांनी कर्मचारी विनोद इंगळे, प्रशांत भटकर, दत्ता वानखडे यांच्यासह घटनास्थळ गाठले. संगीता झटाले यांच्या पोटावर धारदार शस्त्राचे सहा वार आढळून आले.

शिरजगाव बंड येथे महिलेची निर्घृण हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बेलोरा (चांदूर बाजार) : तालुक्यातील शिरजगाव बंड येथील एका ४५ वर्षीय विवाहितेचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना उघड झाली. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलीस सूत्रांनुसार, संगीता विकास झटाले (४५, रा. शिरजगाव बंड) असे मृत महिलेचे नाव आहे. शेजारी राहणारी महिला घरात रक्तबंबाळ स्थितीत पडली असल्याची माहिती शिरजगाव बंड येथील प्रशांत कुरळकर यांनी चांदूर बाजार पोलिसांना दिली. त्यावरून ठाणेदार उदयसिंह सोळंके यांनी कर्मचारी विनोद इंगळे, प्रशांत भटकर, दत्ता वानखडे यांच्यासह घटनास्थळ गाठले. संगीता झटाले यांच्या पोटावर धारदार शस्त्राचे सहा वार आढळून आले. त्या रक्तबंबाळ स्थितीत मृतावस्थेत आढळून आल्या. ही घटना दुपारी १ ते १.३० च्या सुमारास घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. संगीता यावेळी घरी एकट्याच होत्या. त्यांचे पती विकास हे शेतात, मुलगा वाघोलीला, तर मुलगी शाळेत गेली होती. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी मृताच्या पतीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक तेजस्विनी गिरसावळे करीत आहेत.
मारेकरी कोण? गावात दहशत
भरदिवसा आणि भरवस्तीत संगीता झटाले यांचा खून करण्यात आला. त्यांचा रक्तरंजित मृतदेह पाहून ग्रामस्थांची बोबडी वळली. घटनास्थळावरील दृश्य थरकाप उडविणारे होते. एखादा मारेकरी दिवसाढवळ्या घरात शिरतो काय अन् विवाहितेच्या पोटावर सहा वार करून तिला संपवतो काय, हे सारेच ग्रामस्थांसाठी अनाकलनीय होते. एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात घोळत होते. घटनाजन्य पुरावे न आढळल्याने संगीता झटाले यांचा मारेकरी शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून दोन्ही मुलांचा आक्रोश मन थिजविणारा होता.