दलालांच्या मदतीशिवाय परवाना मिळणे कठीणच !
By Admin | Updated: March 14, 2015 00:40 IST2015-03-14T00:38:14+5:302015-03-14T00:40:59+5:30
नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक विभागाने तालुका ठिकाणी महिन्यातून एकदा परवाना देण्यासाठी शिबिर सुरु केले आहे.

दलालांच्या मदतीशिवाय परवाना मिळणे कठीणच !
सुमित हरकुट चांदूरबाजार
नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक विभागाने तालुका ठिकाणी महिन्यातून एकदा परवाना देण्यासाठी शिबिर सुरु केले आहे. या शिबिरात फक्त १०० वाहनचालकांनाच परवाना देण्यात येतो. यामुळे ग्रामीण भागातील दलालांनाही सुगीचे दिवस आले आहे.
वाहतूक विभागाचा नवीन निर्णयानुसार तालुकास्थळी महिन्यातून एकदाच वाहन परवाना शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार तालुक्यातील शेकडो विनापरवाना वाहन चालक या शिबिराची वाट पाहत ताटकाळत बसतात. मात्र पहिल्या ६० दुचाकी चालकांना तर ४० चारचाकी वाहन चालकानाच परवाना देण्यात येतो. वाहतूक विभागाचा या तुघलिकी निर्णयामुळे अनेक इच्छुकांना रात्रीपासूनच शिबिराच्या ठिकाणी तळ ठोकून बसावे लागते. अनेक इच्छुक दलालांना भेटून आधीच आपले वाहन परवाना मिळविण्याबाबत ‘सेटींग’ करतात.
वाहतूक विभाग आयुक्त महेश झगडे यांच्या निर्णयानुसार जिल्हा वाहतूक विभागाचे कार्यालय काही प्रमाणात दलालमुक्त झाले असले तरी परवाना काढणाऱ्याची संख्या ही शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक आहे. त्यामुळे मोजक्या १०० वाहनचालकांना परवाना वाटप करणे म्हणजे दलालांचा तसेच ड्रायव्हींग शाळांच्या माध्यमातून गेल्याशिवाय परवाना मिळणे कठीणच आहे. शहरात दिवसेंदिवस दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढ होत आहे. अशातच ७२ ते ७५ टक्के वाहनचालकांकडे वाहन चालवायचा परवानासुध्दा नाही. अनेक युवा वर्ग विनापरवाना सर्रास वाहने फिरवित आहेत. मात्र या विनापरवाना वाहनचालकांना कोणतीही अडवणूक केली जात नसल्याने अवैध दुचाकी, चारचाकी वाहनचालक तीन सीट, चार सिट बसवून सर्रास ‘धूम’ स्टाईल धावताना आढळतात.
शहरातील जिल्हा परिषद विश्रामगृहावर महिन्याकाठी एका शिबिराचे आयोजन केले होते. येथे परवाना घेण्याकरिता वाहनधारक ग्रामीण भागातून रात्रीपासूनच येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र रांगेत लागूनसुध्दा अनेकांना आल्या पावली परतावे लागले. आयुक्तांचा आदेशाला तिलांजली देत दलालांचा माध्यमातून आलेल्या इच्छुकांना निश्चित परवाना मिळतोच. मात्र भर उन्हात रांगेत उभे राहूनही परवाना न मिळत असल्यानेही तालुक्यात विनापरवाना वाहनचालकांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होत आहे.