गारपिटीसह वादळी पाऊस
By Admin | Updated: October 4, 2015 00:57 IST2015-10-04T00:57:58+5:302015-10-04T00:57:58+5:30
एक महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अंदाजे २५ मिनिटे चांदूरबाजार

गारपिटीसह वादळी पाऊस
चांदूरबाजार : शिरजगावात वादळाचे तांडव
चांदूरबाजार : एक महिन्याच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अंदाजे २५ मिनिटे चांदूरबाजार तालुक्याला वादळी पावसाने झोडपले. यातच दहा मिनिटांपर्यंत गारपीट झाली. हा पाऊस शहरासह देऊरवाडा, शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी, सोनोरी, घाटलाडकी, सुरळी, निमखेड गावांसह शिरजगाव बंड येथेही जोरदार पाऊस झाला.
या पावसाचा सर्वाधिक फटका शिरजगाव बंडला बसला असून तेथील शिवाजी हायस्कूलचे छत पूर्णत: उडाले. शनिवारी शाळा दुपारी बंद झाल्यामुळे जीवितहानी टळली. याच गावातील उपसरपंच मंगेश लेंडे यांच्या माहितीनुसार, गावातील पंधरा ते वीस घरांवरील टिनपत्रे उडून अनेकांचे संसार उघड्यावर आले. यात संजय बंगाले, उत्तम बंगाले, फारुक मुल्ला, राजकुमार मनोहरे, माणिक सावरकर, अरविंद बंगाले, अब्दुल रशिद, अब्दुल गणी यांच्या घरावरील छत पूर्णत: उडाले आहे. शहरातील अनेक वृक्ष चक्रीवादळात कोलमडून पडली. वादळी पावसामुळे शेतात सवंगणी केलेले व कापणीवर असलेले सोयाबीन भिजले. संत्रा उत्पादकांनाही फटका बसला आहे. परतीच्या पावसाने शेतकरी सुखावला असला तरी हाताशी आलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. (शहर प्रतिनिधी)