पक्षबदलाचे वारे; मुस्लिम, दलित मतांचे विभाजन
By Admin | Updated: October 7, 2014 23:27 IST2014-10-07T23:27:37+5:302014-10-07T23:27:37+5:30
गेली अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेले तसेच पक्षाकडून विविध पदे मिळविलेल्या जिल्ह्यातील विशेषत: चांदूरबाजार तालुक्यातील मातब्बर नेत्यांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी एका रात्रीत पक्षनिष्ठेला

पक्षबदलाचे वारे; मुस्लिम, दलित मतांचे विभाजन
सुरेश सवळे - चांदूरबाजार
गेली अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ असलेले तसेच पक्षाकडून विविध पदे मिळविलेल्या जिल्ह्यातील विशेषत: चांदूरबाजार तालुक्यातील मातब्बर नेत्यांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी एका रात्रीत पक्षनिष्ठेला तिलांजली दिली. हे सर्व करताना त्यांनी त्यांच्या यशस्वी राजकीय कारकिर्दीसाठी अहोरात्र सतरंज्या उचलणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांनाही वाऱ्यावर सोडले. पक्षबदलाच्या या वावटळीत मुस्लिम-दलित मतांचे विभाजन होण्याची चिन्हे आहेत.
गत निवडणुकीत युती व आघाडी सोबतीने लढल्यामुळे अकस्मात स्वतंत्र लढण्याची वेळ आली आणि त्यांच्याजवळही सर्वच जागांसाठी प्रबळ उमेदवार नव्हते. त्यामुळे इच्छुकांनी त्यांना उमदेवारी देणाऱ्या पक्षांची चाचपणी केली. इतर पक्षांनी युती-आघाडी दुभंगल्याने प्रबळ उमेदवारांचा शोध घेतला. यातच ज्या उमेदवारांचे पक्षाशी गुणसूत्र जुळले त्यांनी उमेदवारीसाठी पक्ष बदलला. अख्खे आयुष्य काँग्रेसमध्ये घालविणाऱ्या, विधान परिषद तसेच विधानसभेचे आमदार होऊन राज्यमंत्रिपद भूषविणाऱ्या अचलपूरच्या वसुधा देशमुख यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेऊन सर्वांनाच धक्का दिला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी अचलपूर मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळविली.
पक्षबदलाच्या या राजकारणामुळे कालपर्यंत ज्या पक्षात काम केले, त्याच पक्षाविरूध्द बोलताना हे उमेदवार किती प्रभावी ठरतात, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. हिंदुत्ववादी, सेक्युलर, अल्पसंख्यक, दलित, पाटील, देशमुख अशा वेगवेगळ्या व्होट बँकेचे राजकारण करून युती आणि आघाडीने सत्ता मिळविली. पण आता युती, आघाडी फुटल्यामुळे हे समीकरण बिघडले व मते कोणाला द्यावे, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला असून विजयासाठीचा ताळेबंद मांडताना उमेदवारही चक्रावले आहेत.
जिल्ह्यातील पाटील-देशमुख आणि दलित समाजही आजवर आघाडीच्या पाठीशी राहिला. आघाडी विस्कटल्यामुळे मतांचे विभाजन होणार, हे निश्चत आहे. काँग्रेस आघाडी आणि समाजवादी पक्षाची व्होट बँक समजली जाणाऱ्या मुस्लिम समाजाचा प्रभाव अचलपूर मतदारसंघात आहे. आघाडी फुटल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रिंंगणात आहेत. त्यामुळे मुस्लिम व्होट बँकही विभागली जाण्याची शक्यता वर्तविली जात असून त्याचा फायदा नेमका कोणाला होणार? याबाबत उमेदवारही संभ्रमात आहेत.