मिळणार तरी कधी कृषिपंपांची जोडणी ?
By Admin | Updated: July 19, 2015 00:18 IST2015-07-19T00:18:57+5:302015-07-19T00:18:57+5:30
तालुक्यातील कृषी क्षेत्रात हल्ली एक हजाराचेवर कनेक्शनसाठी मागणी अर्ज पडून आहेत.

मिळणार तरी कधी कृषिपंपांची जोडणी ?
आक्रोशाचा अंत केव्हा ? : शेतकऱ्यांनाच जोडावे लागतात डीबीचे फ्यूज, कितीदा घ्यायचे शेतकऱ्यांनी विष ?
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील कृषी क्षेत्रात हल्ली एक हजाराचेवर कनेक्शनसाठी मागणी अर्ज पडून आहेत. ह्या प्रतीक्षेत असलेल्या एक हजारपेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी ज्यांचे कडे सध्या कृषी पंपाची जोडणी आहे त्याचे हाल वाईट आहे.
ओव्हरलोड झालेल्या डी.बी. आणि त्याची देखभाल व दुरुस्ती वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांकडून पैसे उकळल्याशिवाय अजिबात करीत नाहीत. याकरिता गतवर्षी सातेगाव येथे शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. पोलिसांचे संरक्षण घेऊन वीज वितरण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या; पण महिनाभरातच परिस्थिती जैसे थे झाली. मुख्यालयी वितरण कंपनीचे कर्मचारी राहत नाहीत. वीज पुरवठा अखंड होत नाही, कोणतीही पूर्वी सूचना न देता कनेक्शन तोडले जाते. गरजे पोटी अनाधिकृत आर्थिक व्यवहार केले जातात. तक्रार निवारण केन्द्रात सेवा मिळत नाही, सर्वात महत्त्वाचे हे की, पुरेसा विद्युत दाब मिळत नाही. वीज वितरण कंपनीचा त्रास शेतकरी वर्गाला आता अंगवळणी पडला आहे. ग्रामीण भागात कागदोपत्री मुक्कामी राहणारे वायरमन डी.बी.चा फ्युज गेल्यावर कामात पडला तर शेतकऱ्याचे नशीब. पण बहुकरून एखादा खासगी माणूस हाती धरुन अथवा स्वत:च शेतकरी आपला जीव धोक्यात घालून हे काम करतो. ओव्हरलोड झालेल्या डी.बी. हा सिंचन क्षेत्रात डोके दुखीचा विषय आहे.
क्षमतेपेक्षा जास्त कनेक्शन आणि क्षमतेपेक्षा जास्त हॉर्सपॉवरचे पम्प जोडल्याने डी.बी. ओव्हरलोड होतात. ओलित प्रभावित होते. या त्रासाला कंटाळून तालुक्यातील हिरापूरच्या एका शेतकऱ्याने थेट अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विष घेतले होते. वीज कंपनीचा कारभार अधिकृत वायरमनऐवजी नेमलेला मदतनीस चालवतात. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करतात.
वर्षानुवर्षे विजेच्या जोडण्या कृषी क्षेत्रात मिळत नाहीत, पायऱ्या झिजवत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्यावर अप्रिय घटना घडतात, वेळेवर वीज जोडण्या दिल्या आणि कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या वेळेवर सोडविल्या, असे कधी झाले नाही.
सहा महिन्यांत जोडणी करण्याचे आश्वासन
तालुक्यातील प्रलंबित कृषि जोडण्यापैकी ज्या जोडण्या फक्त पोलद्वारे होवू शकतात त्या या सहा महिन्यांतच वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण करण्यात येतील. ज्या जोडप्यांना डि.पी. आवश्यक आहे त्यांना पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत जोडण्या देण्याचा प्रयत्न राहील व हे काम खाजगी एजन्सी मार्फत तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे अंजनगाव येथील सहाय्यक अभियंता विनय तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.