आमचा मुलगा सरकार परत आणून देईल काय ?
By Admin | Updated: June 6, 2016 00:13 IST2016-06-06T00:13:14+5:302016-06-06T00:13:14+5:30
आमच्यासाठी मुलगा महत्त्वाचा होता. तो घरातील कर्ता होता. आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही. आमचा मुलगा सरकार आम्हाला परत आणून देऊ शकते काय,...

आमचा मुलगा सरकार परत आणून देईल काय ?
अमितच्या आईचा सवाल : वाळू तस्करी सुरूच
अचलपूर : आमच्यासाठी मुलगा महत्त्वाचा होता. तो घरातील कर्ता होता. आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही. आमचा मुलगा सरकार आम्हाला परत आणून देऊ शकते काय, असा सवाल अमित बटाऊवाले याची आई अनिता बटाऊवाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
अचलपूर येथे अमित बटाउवाले या युवकाची हत्या रेती तस्करीत सक्रिय असलेल्या बारूद गँगने ११ आॅगस्ट २०१५ रोजी केली. त्याचा संदेश मंडल अधिकारी राजू व्यवहारे यांनी दिला व वाघामाता येथील आ. कडूंच्या कार्यक्रमात देण्यात येईल, असे सांगितले असता बटाऊवाले परिवाराने त्यास नकार दिला. आम्हाला मदतनिधी नको, हत्याऱ्यांना कठोर शिक्षा द्या, अशा शब्दांत त्यांना बजावले. त्या पार्श्वभूमिवर ‘लोकमत’शी अनिता बटाऊवाले बोलत होत्या. पर्यावरणाला धोका असल्याने अचलपूर तालुक्यात रेती उपशावर बंदी घालण्यात आली होती. तरीसुद्धा तालुक्यात रेती तस्करी सुरूच होती, रेतीने भरलेले काही ट्रॅक्टर आमच्या शेतातून जात होते. जनहितासाठी माझे पती मोहन यांनी वाळू तस्करी विरोधात आवाज उचलला. त्यामुळे शासनाचा महसूल वाढला. पण ते संबंधित अधिकाऱ्यांच्या डोळ्यात खुपत होते. याचा काटा वाळूतस्करांना काढायचा होता. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन होते. (शहर प्रतिनिधी)
'त्या' आरोपींवर अद्याप कारवाई नाही
रेती तस्करी थांबून पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी भ्रष्टाचाराच्या आरोपात महसूल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले एकनाथराव खडसे यांनाही लेखी तक्रारी अनेकदा पाठवल्या होत्या. आमच्या निवेदनावर काहीच कारवाई झाली नाही. याचा अर्थ काय समजावा असा प्रश्नही श्रीमती बटाऊवाले यांनी केला.
सदर एक लाख रुपयाचा धनादेश मंडल अधिकारी व्यवहारे यांच्याकडे दिलेला आहे. त्यांनी तो बटाऊवाले यांना दिला की नाही, मला माहीत नाही. त्यांनी नकार दिला हे तुम्हीच मला सांगत आहे. तुम्हाला कोणी सांगितले. बटाऊवाले यांनी तो चेक घेतला नाही तर शासनाकडे परत जाईल.
- मनोज लोणारकर,
तहसीलदार, अचलपूर