जमीनच देणार नाही, मोजणी कशाची ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 00:39 IST2016-12-30T00:39:32+5:302016-12-30T00:39:32+5:30
नागपूर-मुंबई शिघ्रसंचार समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. कसदार जमीन द्यावयास शेतकरी

जमीनच देणार नाही, मोजणी कशाची ?
वीरेंद्र जगतापांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले : समृद्धी प्रकल्पाचा मुद्दा तापला
अमरावती : नागपूर-मुंबई शिघ्रसंचार समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. कसदार जमीन द्यावयास शेतकरी तयार नाहीत. जमीनच देणार नाही, तर मोजणी कशाची, असा संतप्त सवाल आमदार वीरेंद्र जगताप यांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.
जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्याबाबत आधी मोजणी होऊ द्या, नंतर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काय तो निर्णय घेऊ, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर जाम भडकलेल्या आमदार वीरेंद्र जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना हा सवाल केला.
येथील नियोजन भवनात वाशीम, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आ. जगताप यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. प्रस्तावित समृद्धी महामार्गाकरिता अमरावती जिल्ह्यातील ९० व वाशिम जिल्ह्यातील ११० कि. मी. लांबीची जमीन प्रकल्पात अधिग्रहित करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ही सर्व जमीन सुपीक व बागायती आहे. यापूर्वी समांतर महामार्गासाठी याच परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने अधिग्रहीत केलेल्या आहेत.
- सीएम म्हणाले, तुम्हीच व्हा मुख्यमंत्री !
नागपूर-मुंबई या शिघ्रगती महामार्गाला किमान ५० हजार शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकरी त्यांची कसदार व बागायती जमीन द्यावयास तयार नाही, असे आ. जगतापांनी मुख्यमंत्र्यांना सांगताच जर एवढ्या प्रमाणात विरोध आहे तर मी राजीनामा देतो, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, अशा शब्दांत सीएमने भावना व्यक्त केल्या.
समृद्धी प्रकल्पाच्या मुद्यावर आ. जगतापांचा मुख्यमंत्र्यांशी ‘हॉट टॉक’ झाला, तो क्षण.