यंदा राहणार खगोलीय घटनांची रेलचेल
By Admin | Updated: January 1, 2017 00:45 IST2017-01-01T00:45:58+5:302017-01-01T00:45:58+5:30
अंतराळात दररोज असंख्य घडामोडी घडतात. या प्रत्येक घडामोडीला खगोलशास्त्रात फार महत्त्व आहे.

यंदा राहणार खगोलीय घटनांची रेलचेल
उल्का वर्षाव होणार : गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून पृथ्वीजवळ येणार
अमरावती : अंतराळात दररोज असंख्य घडामोडी घडतात. या प्रत्येक घडामोडीला खगोलशास्त्रात फार महत्त्व आहे. २०१७ या वर्षात अनेक खगोलीय घटनांची रेलचेल आहे. ३ जानेवारी रोजी पृथ्वी-सूर्य अंतर कमी कमी राहील. याला ‘पेरेहेलिआॅन’ म्हणतात. १९ जानेवारी रोजी बुध सूर्यापासून २४ अंशावर व ६ फेब्रुवारी रोजी चंद्र पृथ्वीजवळ राहील. या दिवशी पृथ्वी-चंद्र हे अंतर ३,६८,७१८ किलोमीटर एवढे राहणार आहे. २६ फेब्रुवारीचे कंकणाकृती सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही.
२ मार्च रोजी नेपच्यूनची सूर्याबरोबर युती राहील. २० मार्च रोजी संपूर्ण पृथ्वीवर दिवस व रात्र सारखी राहील. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे या दिवसांत दरवर्षाला फरस पडतो. या दिवशी पृथ्वीचा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो.
७ एप्रिल रोजी गुरूपृथ्वीच्या जवळ राहील. या दिवशी गुरू संध्याकाळी पूर्व क्षितीजावर अत्यंत तेजस्वी दिसेल. खगोलप्रेमींना दुर्बिणीतून गुरूचे चंद्र व गुरुवरचा रेड स्पॉट पाहता येईल. ४ मे रोजी रात्री कुंभ राशीतून उल्का वर्षाव होईल. २५ मे रोजी चंद्राजवळ गुरू दिसेल.
१९ आॅक्टोबर रोजी युरेनस पृथ्वीजवळ राहील. १७ ते १९ या काळात सिंह तारकासमूहातून मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव होईल. हा उल्का वर्षाव गावाबाहेर जाऊन अंधाऱ्या भागातून खगोलप्रेमींना साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. ३ डिसेंबर रोजी चंद्राजवळ रोहिणी तारका पाहता येणार आहे.
१४ डिसेंबर रोजी मिथून तारकासमूहातून उल्का वर्षाव होईल. २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस राहील. हा दिवस १० तास ४७ मिनिटांचा राहणार असून पृथ्वीचा अक्ष हा सूर्याच्या बाजूला २३.५ अंशांनी कललेला राहणार असल्याने दिवस लहान राहील. (प्रतिनिधी)
अशा आहेत खगोलीय घडामोडी
येत्या १५ जून रोजी शनीची प्रतियुती आहे. या दिवशी शनी पृथ्वीजवळ राहील. यावेळी पृथ्वी-शनी हे अंतर १३५ कोटी ३० लक्ष कि. मी. राहील. खगोलप्रेमींना ६ इंच दुर्बिणीतून शनीची प्रसिद्ध रिंग पाहता येईल. २१ जूनचा दिवस मोठा राहील. हा दिवस १३ तास १३ मिनिटांचा राहील. ३ जुलै रोजी पृथ्वी-सूर्य हे अंतर जास्तीत जास्त राहील. ७ आॅगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण राहील व हे ग्रहण भारतातून दिसेल. ग्रहण स्पर्श १० वा. ५२ मिनिटाला होईल व मोक्ष रात्री ०.४९ वाजता होईल. ५ सप्टेंबर रोजी नेपच्यून प्रतियुती आहे. या दिवशी नेपच्यून पृथ्वीजवळ राहील व २२ सप्टेंबर रोजी दिवस-रात्र सारखी राहील.
मानवी जीवनावर परिणाम नाही
सर्व घटना या नैसर्गिक आहे. याचा राशीनुसार मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. त्यामुळे कर्मकांडाच्या मागे न लागता या विलोभनीय खगोलीय घटनांचे निरीक्षण करून याचा आनंद घ्यावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.