वन्यपशुंच्या तृष्णातृप्तीत उद्यानाचा अडथळा
By Admin | Updated: May 19, 2016 00:08 IST2016-05-19T00:08:16+5:302016-05-19T00:08:16+5:30
छत्री तलाव मार्गावर सामाजिक वनिकरणाचे जैवविविधता उद्यान वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी अडथळा निर्माण करणारे ठरत आहेत.

वन्यपशुंच्या तृष्णातृप्तीत उद्यानाचा अडथळा
छत्री तलाव पाण्याचा मुख्य स्रोत : तारेचे कुंपण तोडण्याचा वन्यप्रेमींचा इशारा
अमरावती : छत्री तलाव मार्गावर सामाजिक वनिकरणाचे जैवविविधता उद्यान वन्यप्राण्यांच्या तृष्णातृप्तीसाठी अडथळा निर्माण करणारे ठरत आहेत. छत्री तलाव हा वन्यप्राण्यांसाठी मुख्य व मोठा स्त्रोत आहे. मात्र, उद्यानासाठी घालण्यात आलेल्या तारेचे कुंपणामुळे वन्यप्राण्यांना तलावावर पाणी पिण्यास जाता येत नसल्याचे वन्यप्रेमींच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे कुंपण त्वरित काढण्यात यावे, अन्यथा तोडण्यात येईल, असा इशारा मधुबन वन्यजीव संररक्षण संस्थेचे नीलेश कंचनपुरे यांनी सामाजिक वनिकरण विभागाला दिला आहे.
शहरालगतच्या छत्री तलाव- भानखेड मार्गावरील वनविभागाच्या जागेवर सामाजिक वनिकरणाच्या माध्यमातून स्व.उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान उभारण्याचे काम प्रगतिपथावर सुरु आहे. सद्यस्थितीत या उद्यानाच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण लावण्यात आले आहे. हे उद्यान छत्री तलावकडे जाणाऱ्या मार्गालगत आहे. याच मार्गाने जंगलातील वन्यप्राणी छत्री तलावावर पाणी पिण्यास जातात. मात्र, उद्यानाच्या तारेच्या कुंपणामुळे वन्यप्राण्यांना छत्री तलावावर जात येत नसल्याचे वन्यप्रेमींच्या लक्षात आले आहे. वडाळी वनपरिक्षेत्रातील या जंगलात वाघ, बिबट, तडस, काळवीट, रोही, मोर व पक्षांच्या शेकडो प्रजाती वास्तव्यास आहेत. त्यामुळे बहुतांश वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मुख्य नैसर्गिक स्रोत असलेल्या छत्री तलावावर येतात. सद्यस्थितीत तर उन्हाळ्याचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंतीसुध्दा करतात. अशावेळीच वणवण भटकणाऱ्या वन्यप्राण्यांना पाण्याच्या स्रोतापर्यंत पोहणेही कठीण झाले आहे. या जंगलात वाघाचेसुध्दा वास्तव्य असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे आता जैवविविधता वाढण्यापेक्षा ती धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वन्यप्राण्याच्या जिवाचा विचार करून संरक्षक कुंपण त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी मधुबन वन्यजीव संरक्षण संस्थेच्या नीलेश कंचनपुरेने केली आहे. जर १० दिवसांच्या आत ही कारवाही न झाल्यास कुंपण तोडण्यात येईल, अशा इशारा कंचनपुरे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)