कुंपणामुळे वन्यजीव जेरीस
By Admin | Updated: June 2, 2016 01:35 IST2016-06-02T01:35:15+5:302016-06-02T01:35:15+5:30
या उद्यानाच्या कुंपणाचा वन्यजीवांना अडसर होत असल्याने काही वन्यप्रेमींनी कुंपण काढण्याची मागणी केली होती. परंतु कुंपण अद्याप काढण्यात आलेले नाही.

कुंपणामुळे वन्यजीव जेरीस
हरिण, नीलगाय जखमी : छत्री तलावावर जाताना अडसर, कुंपण केव्हा काढणार ?
वैभव बाबरेकर अमरावती
छत्री तलाव मार्गावरील निर्माणाधीन उद्यान वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत आहे.
या उद्यानाच्या कुंपणाचा वन्यजीवांना अडसर होत असल्याने काही वन्यप्रेमींनी कुंपण काढण्याची मागणी केली होती. परंतु कुंपण अद्याप काढण्यात आलेले नाही. बुधवारी पहाटे या कुंपणाला अडकून हरिण जखमी झाले. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वीच निलगाय जखमी झाली होती. मॉर्निंग वॉककरिता जाणाऱ्या काही नागरिकांनी जखमी हरणाच्या उपचारासाठी पुढाकार घेतला. मात्र, अद्याप वनविभागाला जाग आलेली नाही. त्यामुळे वन्यप्रेमींनी रोष व्यक्त केला आहे. सामाजिक वनिकरणाच्या माध्यमातून स्व.उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान उभारण्यात येत आहे. उद्यानाच्या भोवताल तारेचे कुंपण लावण्यात आल्याने वन्यप्राण्यांच्या आवागमनाच्या मार्गातच अडथळा निर्माण झाला आहे. वन्यप्राण्यांना छत्री तलावावर पाणी पिण्यास जाताना त्रास सहन करावा लागतो. त्यांच्याकरिता छत्री तलावचा मुख्य नैसर्गिक जलस्त्रोत आहे. मात्र, तलावाकडे जाताना पशूंना अडसर निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन कुंपण हटविण्याची मागणी मधुबन वन्यजीव सरंक्षण संस्थेच्या नीलेश कंचनपुरे यांनी केली आहे.
उद्यानामुळे जर वन्यप्राण्यांना अडसर निर्माण झाला असेल तर पर्यायी मार्ग काढण्यात येईल. त्यासंबधी सूचना सामाजिक वनिकरणाला देण्यात आल्या आहेत. पुढील कारवाई ते करणार असून त्यावर उपाययोजना करणार आहे.
- संजीव गौड, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक)
आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून बाजू मांडू. मूठभर वन्यप्रेमी उद्यानाचा विरोध करीत असतील तर हे योग्य नाही. नागरिकांनी उद्यानाचा उद्देश समजून घ्यावा. या उद्यानाच्या कुंपणामुळे वन्यप्राण्यांना अडसर होतो, हा मुद्दा चुकीचा आहे.
- प्रदीप मसराम, उपसंचालक, सामाजिक वनिकरण.
उद्यानाच्या कुंपणामुळे वन्यजीवांना मुक्त संचार करता येत नाही. दररोज या कुंपणाशेजारी वन्यजीव फिरताना दिसून येतात. आज एक हरिण कुंपणात अडकून जखमी झाले. त्याला तत्काळ उपचाराकरिता नेले.
-किरण पांडे, नागरिक