मजुरांची वानवा, मान्सूनपूर्व शेतीची कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:12 IST2021-05-10T04:12:46+5:302021-05-10T04:12:46+5:30
प्रशांत काळबेंडे जरूड : कोरोनाचे संकट आणखी गडद होत असताना मान्सूनही जवळ येत आहे. असे असताना पेरणीपूर्व ...

मजुरांची वानवा, मान्सूनपूर्व शेतीची कामे रखडली
प्रशांत काळबेंडे
जरूड : कोरोनाचे संकट आणखी गडद होत असताना मान्सूनही जवळ येत आहे. असे असताना पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतीत यापूर्वी पिकविलेले पीक अद्यापही घरात पडून असल्याने व शेती करण्यासाठी हातात पैसे नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येतो. परंतु, यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे मजूर महिला वर्ग कामावरच जात नसल्याने शेतकऱ्यांपुढे मजुरांची नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यातच पुणे-मुंबई सारख्या शहरात कंपनीत कामावर असलेले शेतकरीपुत्र गावाकडे परत असल्याने व त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे घरात भांडणे होत असून, घरच्या स्त्रियांमध्ये घरकामावरून खटके उडून काैटुंबिक कलह वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात, भावा-भावांमध्ये शेती कसण्यासाठी रस्सीखेच होत आहे. इतकेच नव्हे तर कोणत्याही आजारी व्यक्तीला दवाखान्यात पोहचविण्याचे सौजन्यही दाखवीत नसल्याने या करोनाच्या भीतीने माणसातील माणुसकी नष्ट होत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.