त्रासाला कंटाळून पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:29 IST2020-12-14T04:29:35+5:302020-12-14T04:29:35+5:30
अमरावती : पतीने पत्नीचा सतत मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ केला. त्याला कंटाळून महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन ...

त्रासाला कंटाळून पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
अमरावती : पतीने पत्नीचा सतत मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ केला. त्याला कंटाळून महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, गळफास लावल्यानंतर दुपट्ट्याची गाठ सुटल्याने त्या बेशुद्ध झाल्या. त्यानंतर नंदेने तिला दवाखान्यात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही घटना दत्तुवाडी महाजनपुरा येथे ९ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी गुन्हा नोंदविला.
आरोपी संतोष बाबाराव बागडे (३६, रा. दत्तुवाडी महाजनपुरा) याच्यावर पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ४९८(अ)नुसार गुन्हा नोंदविला. यासंदर्भात २९ वर्षीय महिलेने तक्रार नोंदविली. पोलीससूत्रानुसार, फिर्यादी ही घरी हजर असताना आरोपी पतीने घरातील साहित्याची फेकफाक करून तिला घराबाहेर जाण्यास सांगितले. तिने नकार देताच त्याने शिवीगाळ करून थापडा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर डोक्यावर मारत असताना ती मागे सरकल्याने तिच्या डोळ्याला इजा झाली. त्यानंतर पती घरातून बाहेर निघून गेला. पतीकडून सतत होणाऱ्या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून तिने कापडी दुपट्ट्याच्या साह्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तिने पोलिसांना दिलेल्या बयाणावरून गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास खोलापुरी गेट पोलीस करीत आहे.