तपासकार्य देण्यासाठी पत्नीचा आटापिटा
By Admin | Updated: August 9, 2015 00:29 IST2015-08-09T00:29:28+5:302015-08-09T00:29:28+5:30
धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तपासाचे काम न देता मानसिक खच्चीकरण करीत असल्याची तक्रार पोलीस शिपायाच्या पत्नीने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

तपासकार्य देण्यासाठी पत्नीचा आटापिटा
एसपींकडे तक्रार : धारणीच्या ठाणेदारावर पक्षपाताचा आरोप
अमरावती : धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तपासाचे काम न देता मानसिक खच्चीकरण करीत असल्याची तक्रार पोलीस शिपायाच्या पत्नीने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. अनिता मनोहर तायडे (रा. पोलीस लाईन) असे तक्रारकर्ता महिलेचे नाव असून पतीला पूर्ववत जबाबदाऱ्या देण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
महिलच्या तक्रारीनुसार त्यांचे पती मनोहर तायडे हे १९९३ पासून पोलीस विभागात कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून धारणी पोलीस ठाण्यात ते पोलीस शिपाई आहेत.
पात्रता असूनही जबाबदारी नाकारली
अमरावती : मनोहर तायडेंच्या पत्नी दोन मुलांसोबत अमरावती शहरात राहत असून मनोहर एकटेच धारणीत राहतात. अनिता तायडे यांच्यानुसार त्यांचे पती कर्तव्यदक्षतेने काम करीत आहेत. मात्र, तरीही हेतुपुरस्सरपणे धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर शेळके त्यांना त्रास देतात. यामुळे आपल्या पतीचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचा आरोेप अनिता तायडे यांनी तक्रारीतून केला आहे.
याबाबत अनिता यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असता ठाणेदारांशी चर्चा केल्यानंतर काय ते सांगू, असे सांगून त्यांची बोळवण केल्याचे अनिता यांचे म्हणणे आहे. मनोहर तायडे यांना कोणतेही व्यसन नसून ठाणेदारांच्या त्रासामुळे ते नेहमीच तणावात राहात आहेत. अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदार तपासाचे काम देतात. मात्र, मनोहर तायडे यांची पात्रता असूनही त्यांना जबाबदारी दिली जात नसल्याचा आरोप अनिता तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.