शेतकऱ्यांच्या विधवाच ‘सेलिब्रिटी’
By Admin | Updated: January 4, 2017 00:26 IST2017-01-04T00:26:48+5:302017-01-04T00:26:48+5:30
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांचे दु:ख विशद करण्याकरिता शब्दही अपुरे पडतील.

शेतकऱ्यांच्या विधवाच ‘सेलिब्रिटी’
स्वप्निल जोशी : भूमिपुत्र फाऊंडेशनद्वारे ४० कुटुंबांना मदत
चांदूरबाजार : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांचे दु:ख विशद करण्याकरिता शब्दही अपुरे पडतील. अशाही परिस्थितीत या महिला सामाजिक, आर्थिक व प्रापंचिक समस्यांचा सामना करीत कुटुंबाचा नेटाने सांभाळ करतात म्हणूनच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवाच खऱ्या सेलिब्रिटी आहेत, असे प्रतिपादन सिने अभिनेता स्वप्निल जोशी यांनी केले.
भूमिपूत्र फाऊंडेशन व श्रीसंत गजानन महाराज संस्थान, शेगावच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सलाम भूमिपुत्रांच्या वीर पत्नींना’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. बच्चू कडू होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शेषराव डोंगरे, आनंद सोरगिवकर, अनंत कौलगिकर, देवेंद्र गोडबोले, दीपक धोटे आदी उपस्थित होते.
यावेळी भूमिपूत्र फाऊंडेशनतर्फे चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यातील ४० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना धनादेशाद्वारे आर्थिक मदत देण्यात आली. या फाऊंडेशनने दोन्ही तालुक्यातील आत्महत्याग्रस्त ५३७ कुटुंबांना मदतीसाठी दत्तक घेतले आहे. यात चांदूरमधील ३२०, तर अचलपूर तालुक्यातील २१७ शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)