बडनेऱ्यात जागोजागी मृत्यूचे सापळे
By Admin | Updated: December 8, 2015 00:17 IST2015-12-08T00:17:35+5:302015-12-08T00:17:35+5:30
राष्ट्रीय महामार्गासह बडनेरा शहरापासून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून राजरोसपणे धोकादायक वाहतूक अधिक प्रमाणात होत आहे.

बडनेऱ्यात जागोजागी मृत्यूचे सापळे
कोण घालणार आवर ? : प्रादेशिक परिवहन, पोलीस यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष
बडनेरा : राष्ट्रीय महामार्गासह बडनेरा शहरापासून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून राजरोसपणे धोकादायक वाहतूक अधिक प्रमाणात होत आहे. वाहनांच्या बाहेर आलेल्या पोल्स, लोखंडी सळाखा नागरिकांच्या जीविताला धोकादायक ठरत आहेत.
नियमबाह्य वाहतुकीमुळे अनेकांचा बळी जात आहे. या धोकादायक वाहतुकीचा फटका अनेकांना बसला असून हातापायांनी पंगू होण्याची वेळ शेकडोंवर आलेली आहे. पोलीस, महामार्ग पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे दर दिवसाला धोकादायक वाहतूक होत आहे. यामुळे दरदिवसात लहान मोठ्या अपघातांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. बडनेरा शहरात तसेच येथून जाणाऱ्या महामार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते.
वीज वितरण कंपनीच्या कामातील कंत्राटदाराकडून नियमबाह्य लोखंडी पोल्स, सिमेंटचे पोल्स ट्रॅक्टर किंवा इर मालवाहू गाड्यांमधून नेल्या जात आहे. असे करताना वाहतुकीचे कुठलेच नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे. ३० फुटांपर्यंत पोल्स मालवाहू गाड्या किंवा ट्रॅक्टरमधून नेले जातात. मागील व समोरच्या भागात बऱ्याच प्रमाणात हे पोल्स बाहेर येतात. त्याला लाल कपडादेखील बांधलेला नसतो. एकतर अशी वाहतूक करणेच नियमबाह्य आहे. यामुळेच अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. बडनेरा शहरात अशा वाहतुकीला उधाण आले आहे. सुरळीत वाहतुकीला यामुळे मोठा अडसर निर्माण होत आहे.
क्षमतेपेक्षा अधिक मालाचे वहन, वाहनाबाहेर लोंबकळणाऱ्या लोखंडी सळाखा, क्षमतेपेक्षा अधिक माल घेऊन जाणारे ट्रक्स बडनेरा शहरातूनच महामार्गाकडे किंवा शहरात जात आहे. ही बाब अत्यंत धोक्याची ठरत आहे. नियमबाह्य व धोकादायक अशा वाहतूकदाराला कुणाचाच धाक वाटत नसल्यामुळे बिनदिक्कत अशी वाहतूक होत आहे. याला कोण लगाम घालणार, असा प्रश्न शहरवासीयांनी केला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बडनेरा शहरात वाहतूक प्रचंड वाढली आहे. अशात ही धोकादायक वाहतूक नाहक जिवितास धोक्याची ठरू शकते, हे नाकारता येणार नाही. शहरातील अनियंत्रित वाहतुकीने आजपर्यंत अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने भर पडत आहे. अनेक जणांचे जीव गेले असून काहींना अपंगत्व आले आहे. परंतु याप्रकाराकडे संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. अनियंत्रित वाहतूक आणखी कुणाच्या जीवावर बेतणार, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.