एसटी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही?
By Admin | Updated: August 27, 2015 00:34 IST2015-08-27T00:34:58+5:302015-08-27T00:34:58+5:30
बेजबाबदारपणे एसटी बस दामटून निर्दोष साहिलचा बळी घेणाऱ्या चालक आणि वाहकाविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

एसटी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही?
गावकऱ्यांचा संतप्त सवाल : पोलिसांविरूध्द रोष कायमच
वैभव बाबरेकर अमरावती
बेजबाबदारपणे एसटी बस दामटून निर्दोष साहिलचा बळी घेणाऱ्या चालक आणि वाहकाविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मृत साहिल व त्याचा मोठा भाऊ हृतिक हे दोघेही अमरावती येथे शाळेत जाण्यासाठी मंगळवारी सकाळी माहुली येथील चौकात बसगाडीची प्रतीक्षा करीत होते. सकाळी ६.४५ वाजता मोर्शी-बुलडाणा ही बस माहुलीत आली आणि मुख्य मार्गावरच थांबली. बस सुरु असतानाच वाहकाने प्रवासी घेण्यास सुरूवात केली. अन्य प्रवाशांच्या गर्दीत चिमुकला साहिल बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, गर्दीमुळे साहिल मागे राहून गेला. शेवटून बसगाडीत चढत असताना अचानक बसगाडी धावू लागल्याने साहिल पाय घसरून खाली पडला.
चालकाचा बेंजबाबदारपणा भोवला
अमरावती : उपस्थितांनी आरडाओरड केली. हा गोंधळ चालक आणि वाहकाच्या कानावरही गेला. मात्र, निर्ढावलेल्या वाहकाने तरीही ‘डबल बेल’ दिली आणि चालकाला गाडी दामटण्याची सूूचना केली. यामुळेच साहिल एसटीच्या मागच्या चाकात चिरडला गेला, असा आरोप गावकऱ्यांचा आहे.
काय म्हणतात नियम ?
मुळात बसगाडी भररस्त्यावर उभीच करू नये. प्रवासी बसगाडीत चढत असताना बसगाडीचे इंजिन बंदच असावे. वाहकाने चढणाऱ्या प्रवाशांकडे जातीने लक्ष द्यावे. चढताना झुंबड होणार नाही यासाठीचा कटाक्ष बाळगावा. ज्या प्रवाशांना जसे- वयोवृध्द, अपंग नागरिक वा लहान मुले गरज भासेल त्यांना वाहकाने बसगाडीत चढण्यासाठी मदत करणे हे वाहकाचे कर्तव्यच आहे. संपूर्ण प्रवासी बसगाडीत सुरक्षितपणे चढल्याची खातरजमा झाल्यानंतर वाहनाचे प्रवेशद्वार दोन्ही कुलुपांचा वापर करून वाहकाने बंद करायला हवे. त्यानंतरच बसगाडी हाकण्यासाठीची घंटा वाजवायला हवी. चालकानेदेखील बस हाकताना दरवाजा बंद केला की कसे, याची खातरजमा करायलाच हवी. या घटनेत वाहक आणि चालकांनी या सर्वच नियमावलीचे जाणिवपूर्वकरित्या उल्लंघन केले. अशा कृत्यामुळे चढणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू होऊ शकतो याची पुरेपुर कल्पना असतानाही केलेले हे कृत्य सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच ठरतो.