का ओढविली पोलिसांवर नामुष्की?
By Admin | Updated: August 26, 2015 00:02 IST2015-08-26T00:02:22+5:302015-08-26T00:02:22+5:30
अमरावतीपासून २० किमी दूर असलेल्या माहुली गावात मंगळवारी दिवसभर तणावाची स्थिती होती.

का ओढविली पोलिसांवर नामुष्की?
गणेश देशमुख अमरावती
अमरावतीपासून २० किमी दूर असलेल्या माहुली गावात मंगळवारी दिवसभर तणावाची स्थिती होती. गावकऱ्यांचा पोलिसांवर जहाल रोष निर्माण झाल्यामुळे शस्त्रसज्ज पोलिसांना शेतांच्या धुऱ्याने पळावे लागले. कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठीच नेमणूक असलेल्या पोलीसांना गावात जाण्याचे धैर्य उरू नये, जीव मुठीत घेऊन माहुली ठाण्याचा आधार घ्यावा लागावा, ही बाब चिंतनीयच!
ज्यांच्या शिरावर कायदा अबाधित राखण्याची जबाबदारी होती ते पोलीस गावाबाहेर थांबलेले आणि आमदारांसह महसूल प्रशासनाची चमू कायदा सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात गावात गुंतलेली, असे आगळे चित्र मंगळवारी माहुलीत होते.
ज्वालामुखीसमान खदखदणाऱ्या गावकऱ्यांसमोर जाणे, त्यांचे समाधान करणे हे कार्य जितके धोक्याचे तितकेच ते लढवय्य बाणा अन् चाणाक्ष बुद्धीमत्तेचा कस लावणारेही होते. आमदार, जिल्हाधिकारी आणि त्यांच्या चमूने हे कार्य लिलया पार पाडले. साहिलचा अंत्यविधी होईस्तोवर ही मंडळी आत्मविश्वासाने तेथे होती. तथापि, हे हे धाडस पोलीस दाखवू शकले नाहीत. पोलिसांवर उद्भवलेला प्रसंग बाका होता. त्याचे समर्थन होऊ नयेच. पण ही स्थिती पोलिसांनीच स्वत:वर ओढवून घेतली असेल तर त्याचे 'आॅपरेशन' जरूर व्हायलाच हवे.
सामान्य पोलिसांवर संकट ओढवत असले तर अशावेळी धुरा त्यांच्या सेनापतीने सांभाळायला हवी. घटनास्थळी जातीने हजर राहून वरिष्ठांनी स्थिती हाताळणे अपेक्षित आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रुबाब मोठा असतो. त्यांचे अधिकार व्यापक असतात. अवघ्या पोलिसांचे ते प्रेरणास्थान असतात. त्यांची बुद्धीमत्ताही कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा जास्त असते. अशा बिकट समयी स्थिती कशी हाताळायची, नियंत्रण कसे मिळवायचे, हारलेली बाजी कशी जिंकायची याचे प्रशिक्षणच वरिष्ठांनी स्वकृतीतून कनिष्ठांपुढे सादर करायचे असते. माहुलीच्या घटनेत वरिष्ठांना ही संधी होती, मात्र त्यांनी ती गमावली.
लोकविश्वास परत मिळवावा!
गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला म्हणून त्यांच्याविरुद्ध आकसाने खटले भरणे हा सुदृढ लोकशाही जपण्यासाठीचा उपाय असू शकत नाही. आयुष्यातील संघर्षाचा सामना करून थकल्यावर जीवन संपविणाऱ्या 'शेतकरी जमाती'तील मनुष्यप्रण्यांची संख्या माहुली गावात जास्त आहे. कुणाविरुद्ध आवाज काढण्याची या जमातीची रीतच नाही. तरीही ही मंडळी इतकी का संतापली? का त्यांनी इतका थयथयाट केला? त्यांच्यात हा आक्रोष कुठल्या कारणाने आला, याची उत्तरे शोधणे आणि त्यावर उपचार करणे हा या समस्येवरील खरा उपाय.
शेतकरी, शेतमजुरांची ७० ते ८० मुले माहुली गावातून रोज अमरावती येतात. सकाळी ६.४५ वाजता ते त्या गावातून बसगाडीने निघतात. त्यांच्यासाठी वेगळी बसफेरी द्यावी, अशा लाख विनंत्या त्यांनी प्रशासनाला केल्या होत्या.