तुरीचे भाव का पाडले; संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
By Admin | Updated: February 2, 2016 00:01 IST2016-02-02T00:01:26+5:302016-02-02T00:01:26+5:30
एफसीआयद्वारा तूर खरेदी झाल्यानंतर उर्वरित तुरीची स्थानिक व्यापाऱ्यांद्वारा भाव पाडून खरेदी केली जात आहे.

तुरीचे भाव का पाडले; संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
भावात तफावत : बाजार समिती पदाधिकाऱ्यांशी चर्चा, मंगळवारी बैठक
अमरावती : एफसीआयद्वारा तूर खरेदी झाल्यानंतर उर्वरित तुरीची स्थानिक व्यापाऱ्यांद्वारा भाव पाडून खरेदी केली जात आहे. या लुटीच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी सोमवारी बाजार समितीवर धडक देऊन पदाधिकाऱ्यांना याविषयी जाब विचारला.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एफसीआय व नाफेडद्वारा स्थानिक दरात तुरीची खरेदी करण्यात येते. यावेळी साधारणपणे ९ हजारांच्या दरम्यान भाव मिळतो. मात्र, ही खरेदी झाल्यानंतर उर्वरित तूर स्थानिक खरेदीदार ८ हजार रुपये दराने खरेदी करतात. यामध्ये शेतकऱ्यांची खुलेआम लूट होत आहे. या संदर्भात प्रदीप अरबट, दिलीप घोगरे, राजेश पाथरकर, चंद्रशेखर इंगोले, मनोज वैद्य, संजय काळे, नीलेश काळे, किशोर देशमुख, गुणवंत ढोरे, प्रदीप इंगोले, अशोक गुडधे, मंगेश ढोरे, जयंत देशमुख, अजय नांदणे आदींनी बाजार समितीवर धडक दिली. यावेळी त्यांनी बाजार समितीचे सभापती, उपसभापती व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, तोडगा निघाला नाही. यासंदर्भात मंगळवारी बाजार समिती पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे.
शेतकऱ्यांचा माल येताच भावात घसरण
शेतकऱ्यांचा माल ज्यावेळी बाजारात विक्रीसाठी येतो. त्याचवेळी नेमके भाव पाडल्या जातात. सद्यस्थितीत शेतकऱ्यांची तुरीची आवक वाढली आहे. सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एफसीआयद्वारा ८,७०० रुपयांनी खरेदी करण्यात आली. या खरेदीनंतर स्थानिक खरेदीदारांनी ७,६०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली. चाळणी मारल्यानंतर पाच किलची तूट येईल. १०० ते २०० रुपयांचा फरक पडेल. मात्र हजारांच्यावर भावात तफावत ही लूट असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
एफसीआयच्या खरेदीनंतर उर्वरित तुरीचे भाव पाडण्यात येत आहेत. स्थानिक खरेदीदारांद्वारा शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आता माघार घेणार नाही.
- प्रकाश अरबट,
जनमंच, नागपूर.