लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : प्रेमसंबंधातून पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढला. त्याच्या चेहऱ्यावर राफ्टरने वार करून त्याला जिवानिशी ठार केले. पथ्रोट येथील झेंडा चौक येथे मंगळवारी रात्री १०:४५ च्या सुमारास खुनाची ती घटना घडली. अरविंद नजीर सुरत्ने (३७, रा. गरजदरी, ह.मु पथ्रोट) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी ३ सप्टेंबरला पहाटे ४ च्या सुमारास एका महिलेसह तिच्या प्रियकराविरुद्ध खून व अॅट्रासिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. एसडीपीओ मनीष ठाकरे यांनी आरोपी मारेकऱ्याला मंगळवारी रात्रीच अटक केली. महिलेला बुधवारी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.
मृताचा मोठा भाऊ अशोक यांनी याप्रकरणी तक्रार नोंदविली. पोलिसांनी मारेकरी अमित लवकुश मिश्रा (३३, रा. पथ्रोट) याच्यासह ३८ वर्षीय महिलेला अटक करून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. व्यवसायाने चालक असलेल्या अरविंदचा प्रेमविवाह झाला होता. तो पत्नी व दोन मुलांसमवेत झेंडा चौकात भाड्याने राहत होता. २ सप्टेंबर रोजी रात्री ११:४५ च्या सुमारास फिर्यादी अशोक हे परतवाडा येथे असताना त्यांना भाचा अनिलने फोन केला. अरविंद मामा व मामी यांच्यात अमित मिश्रा याच्याशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे कडाक्याचा वाद झाला आणि यातूनच खून झाल्याचे अनिलने सांगितले. त्या दोघांनीच अरविंदला मारून टाकल्याचे अशोक सुरत्ने यांनी फिर्यादीत सांगितले आहे.
मंगळवारी रात्री कडाक्याचे भांडण
अरविंद यांना ७ व ५ वर्षे वयाची दोन मुले आहेत. दरम्यान, त्यांनादेखील पत्नीच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. दोन दिवसांपूर्वी अरविंद यांच्या घरचे गॅस सिलिंडर संपले. ते आरोपी अमितने भरून आणले. ती बाब अरविंद यांना समजताच त्यांनी पत्नीला जाब विचारला. आरोपीने आणून दिलेल्या सिलिंडरमुळे त्यांच्यातील वाद अधिक वाढला. २ सप्टेंबरला रात्री अरविंद व त्यांच्या पत्नीत कडाक्याचे वाजले. ती बाब तिने आरोपीला सांगितली. आरोपी अरविंदच्या घरी पोहोचला. तथा दोघांनी मिळून अरविंदचा खून केला. अरविंद यांची पत्नी आरोपीकडे स्वयंपाकाचे काम करायची. आरोपी अविवाहित आहे.
"संबंधित महिलेनेदेखील पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. पती पत्नीत आरोपीने आणून दिलेल्या सिलिंडरवरून वादाला तोंड फुटले होते. मारेकऱ्याला मंगळवारी रात्रीच अटक केली. तर, महिलेला बुधवारी अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे."- मनीष ठाकरे, एसडीपीओ, अंजनगाव सुर्जी